Parbhani ZP Election 2026 Sarkarnama
मराठवाडा

Parbhani ZP: परभणी झेडपीत असाही रेकॉर्ड! आई-वडील अन् दोन भावांना मिळाली अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची संधी

Parbhani ZP: सुजाण मतदारांनी अनेकदा घराणेशाहीला घरचा रस्ता दाखवल्याची अनेक उदाहरणं आहेत. तर हाच मतदार परंपरेप्रमाणे काही राजकारण्यांना सातत्याने निवडूनही देतो.

गणेश पांडे : सरकारनामा

Parbhani ZP News: राजकारणातील घराणेशाहीवर नेहमीच टीका होते, तर पण काही राजकीय घराणी ही नेतृत्व आणि कर्तृत्वावर आम्ही यशस्वी झाल्याचा दावा करतात. निष्ठावंतांनी फक्त संतरज्या उचलायच्या का? असा प्रश्न राजकारणात नेहमी विचारला जातो. शेवटी मतदार काय विचार करतो? हे ही तितकेच महत्त्वाचे. सुजाण मतदारांनी अनेकदा घराणेशाहीला घरचा रस्ता दाखवल्याची अनेक उदाहरणं आहेत. तर हाच मतदार परंपरेप्रमाणे काही राजकारण्यांना सातत्याने निवडूनही देतो.

परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत असाच काहीसा प्रकार पहायला मिळाला. आज झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आले. श्रीकांत विटेकर यांची या पदावर वर्णी लागली. आमदार राजेश विटेकर यांचे ते बंधू आहेत. परभणी जिल्हा परिषदेत विटेकर यांचे वडील, आई व स्वतः त्यांना अध्यक्ष पद भूषवण्याची संधी मिळाली होती. तर आता त्यांचे बंधू श्रीकांत विटेकर हे उपाध्यक्ष झाले आहेत.

माजी आमदार दिवंगत उत्तमराव विटेकर यांनी यापुर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. पुलोदच्या काळात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची राजकारणात ओळख होती. महातपुरी सर्कलमधून निवडून येत त्यांनी जिल्हा परिषदेत नेतृत्व सिद्ध केले. त्यांचा राजकीय वारसा पुढे नेत राजेश विटेकर यांनी वडगाव आणि शेळगाव या गटांतून विजय मिळवत जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषविले.

त्यानंतर कुटुंबातील आणखी एक सदस्य म्हणून त्यांच्या मातोश्री निर्मला विटेकर यांनीही सदस्यपदापासून अध्यक्षपदापर्यंत मजल मारली होती. आता या यादीत अॅड. श्रीकांत विटेकर यांच्या नावाची भर पडली आहे. शेळगाव गटातून ते निवडून आले आहेत. राजकारणात पदार्पण करताच उपाध्यक्षपद मिळाल्याने त्यांना काम करण्याची मोठी संधी या निमित्ताने चालून आली आहे.

यापूर्वी सोनपेठ नगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तर त्यांच्या पत्नीही सध्या नगरपालिकेत सदस्या व गटनेत्या म्हणून सक्रिय आहेत. जिल्हा परिषदेत सलग तीन पिढ्यांनी नेतृत्व करत सत्ता टिकवून ठेवल्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT