बीड : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविणाऱ्या महायुतीच्या राज्यात सत्ता स्थापनेचा मुहूर्त नजीक आला आहे. आता मंत्रीपदांची गणिते मांडली जात असून जिल्ह्यात राष्ट्रवादीतून धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके तर भाजपमधून पंकजा मुंडे व सुरेश धस यांच्या नावांची चर्चा होत आहे. धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे आपापल्या पक्षातील ताकदवर नेते मानले जातात. तर, प्रकाश सोळंके व सुरेश धस हे दोघे राजकारणात आणि विधीमंडळातील अनुभवात सिनीअर आहेत. त्यामुळे मंत्रीपदाचा मुकूट कोणाच्या डोक्यावर चढणार? हे पहावे लागणार आहे.
जिल्ह्यात यापूर्वी दिवंगत श्रीपतराव कदम, सुंदरराव सोळंके, गोपीनाथराव मुंडे, डॉ. विमलताई मुंदडा तसेच शिवाजीराव पंडित, बदामराव पंडित, जयदत्त क्षीरसागर, प्रा. सुरेश नवले, सुरेश धस, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आदींना मंत्रीपदे मिळालेली आहेत. (Beed News) महायुतीच्या पहिल्या सरकारच्या वेळी पंकजा मुंडे यांना राज्यात महत्वाच्या खात्याचे मंत्रीपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही मिळाले होते. मागच्या वेळी जिल्ह्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसेच पाच आमदार विजयी झाले आणि धनंजय मुंडे यांना मंत्रीपद व पालकमंत्रीपद मिळाले.
पुढे महायुतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहभागानंतर धनंजय मुंडे यांना पुन्हा पालकमंत्रीपद देण्यात आले होते. दरम्यान, आता झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यातून महायुतीचे सहा पैकी पाच आमदार विजयी झाले. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (Dhananjay Munde) धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके व विजयसिंह पंडित तर भाजपकडून सुरेश धस व नमिता मुंदडा यांचा समावेश आहे. यातील विजयसिंह पंडित पहिल्यांदा विधीमंडळात पोचले आहेत. तर, धनंजय मुंडे दोन वेळा परिषदेच्या माध्यमातून तर दुसऱ्यांदा परळीतून विजयी झाले आहेत.
याच पक्षाचे प्रकाश सोळंके पाचव्यांदा विधानसभा निवडणुकीतून विधीमंडळात पोचले आहेत. तर, चौथ्यांदा आष्टी विधानसभेतून विजयी झालेले सुरेश धस यांनी लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य मतदार संघाचेही प्रतिनिधित्व केले होते. नमिता मुंदडा दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. दरम्यान, पालकमंत्री पदाबाबत धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्या नावांची चर्चा आहे. धनंजय मुंडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. अजित पवारांचे निकटवर्तीय, आक्रमक वक्ते, कुशल संघटक आणि मोठ्या फरकाने विजय या त्यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात.
यापूर्वीच्या मंत्रीपदाचा अनुभवही त्यांच्या पाठीशी आहे. तर, पंकजा मुंडे विधान परिषदेत प्रतिनिधित्व करत आहेत. त्या भाजपमधील प्रमुख ओबीसी व महिल्या नेत्या असून त्याही आक्रमक वक्त्या आणि दिवंगत मुंडेंच्या राजकीय वारसदार आहेत. 2019 च्या पराभवानंतर भाजपने टाळलेल्या पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाने विधान परिषदेवर संधी दिली. त्यांनी या निवडणुकीत भाजपच्या राज्यभरातील विविध उमेदवारांचा प्रचार केलेला आहे. महायुतीचे सरकार आले तर पंकजा मुंडे मंत्री होतील असा उल्लेख अनेक सभांमधून त्यांच्या भगीनी डॉ. प्रितम मुंडे यांनीच केलेला आहे.
त्यामुळे त्यांचेही नाव या स्पर्धेत आघाडीवर मानले जाते. मात्र, दोन मुंडेंना मंत्रीपद द्यायचे तर दोघेही एकाच घरातले आणि एकाच मतदार संघातले असा किचकट मुद्दा आहे. आता त्यांचे पक्ष याबाबत काय निर्णय घेतात? हे पहावे लागेल. धनंजय मुंडे यांच्या पक्षातील प्रकाश सोळंके यांनी सिनीअॅरीटीच्या मुद्द्यावर मंत्रीपदासाठी आपली दावेदारी पुढे केली आहे. पाच वेळा विधीमंडळात जाणारे सोळंके यांनी मागच्या निवडणुकीतच या पदासाठी आगपखाड केली होती. त्यांनाही मंत्रीपदाचा अनुभव आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस मुंडे व सोळंके या दोघांना संधी देणार का? एखाद्या नावावर फुली मारणार हे पहावे लागेल. सुरेश धस चौथयांदा आष्टीतून विजयी झाले असून त्यांनी एकदा परिषदेतही प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यांनाही मंत्रीपदाचा अनुभव आहे. देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जातात. राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंचे नाव पुढे आले तर सामाजिक समिकरणे जुळविण्यासाठी भाजपकडून धसांचे नावही पुढे येऊ शकते. मात्र, अलिकडे धस व मुंडे यांच्यात वाढलेल्या दरीमुळे मुंडेंकडून धसांना विरोध करुन नमिता मुंदडा यांचे नाव पुढे केले जाऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.