Pankaja Munde-Dhananjay Deshmukh News Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Deshmukh On Pankaja Munde : पंकजा मुंडे गावात आल्या असत्या अन् त्यांच्या गाडीवर हल्ला झाला असता तर मला जबाबदार ठरवलं गेलं असतं!

Dhananjay Deshmukh reveals the reason why Pankaja Munde was advised not to visit the village. Find out the details behind this intriguing disclosure. : धनंजय देशमुख यांनी पंकजा मुंडे यांना आपण त्यावेळी गावात येऊ नका? असे का म्हणालो होतो, याचे स्पष्टीकरण दिले आहे.

Jagdish Pansare

Beed Political News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन तीन महिने उलटले आहेत. मात्र यावरून सुरु असलेले राजकारण मात्र काही केल्या थांबताना दिसत नाहीये. या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयात देशमुख कुटुंबाचा लढा सुरू आहे. तर दुसरीकडे त्यांना राजकीय आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे यालाही तोंड द्यावे लागत आहे. मंत्री पकंजा मुंडे यांनी सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणानंतर कुटुंबियाची भेट का घेतली नाही? यावरून त्यांच्यावर टीका केली गेली.

परंतु आपण या दुर्दैवी आणि चीड आणणाऱ्या घटनेनंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांना फोन करून भेटण्यासाठी मस्साजोगला येत असल्याचे कळवले होते. तेव्हा त्यांनी मला गावातील परिस्थिती पाहता येऊ नका, असे सांगितले होते, असे स्पष्टीकरण दिले. यावर धनंजय देशमुख यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना आपण त्यावेळी गावात येऊ नका? असे का म्हणालो होतो, याचे स्पष्टीकरण दिले आहे. पंकजा मुंडे तेव्हा आल्या असत्या आणि आरोपींचे समर्थन करणाऱ्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली असती तर त्याची जबाबदारी माझ्यावर आली असती, असे म्हटले आहे.

राज्याच्या राजकारणात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर भाजपा आमदार सुरेश धस विरुद्ध धनंजय, पंकजा मुंडे असा संघर्ष सुरू झाल्याचे चित्र आहे. (Santosh Deshmukh) देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध, पंकजा मुंडे यांनी निवडणुकीत आपले काम केले नाही, असे आरोप करत धस यांनी गेल्या काही महिन्यांपासून मुंडे बहीण-भावाविरोधात आक्रमक पावित्रा घेतला आहे. यातून दररोज नवनवे आरोप दोन्ही बाजूंनी केले जात आहेत.

त्यापैकीच एक म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पंकजा मुंडे या अजूनही या कुटुंबाची सांत्वन करण्यासाठी गेल्या नाहीत. यावर पंकजा मुंडे यांनी यापूर्वीही स्पष्टीकरण दिले होते. संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्या नंतर आपण त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालो होतो. आपल्या कार्यकर्त्यांनी धनंजय देशमुख यांना भेटण्यासाठी येत असल्याचा फोन सुद्धा केला. पण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे देशमुख यांनी सांगितल्याने, फोनवरच आपण त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केल्याचे पंकजा यांनी स्पष्ट केले होते.

त्यानंतर आता धनंजय देशमुख यांनी आपण पंकजा मुंडे यांना गावात येण्यापासून का रोखले? यावर स्पष्टीकरण दिले आहे. पंकजा मुंडे यांनी मला भेटायला येण्यासाठी फोन केला होता परंतु या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. आरोपीचे समर्थन करणाऱ्या लोकांचे आमच्याकडे नेहमी लक्ष होते. त्यांची आणखीही आमच्यावर नजर आहे. आरोपीचे समर्थन करणार्‍यांनी जर पंकजा मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक वगैरे केली असती तर त्याला मला जबाबदार धरण्यात आले असते.

दुर्दैवाने असे घडले असते तर पुन्हा या प्रकरणाला जातीय रंग दिला गेला असता. म्हणून तेव्हा मी पंकजा मुंडे यांना गावात येऊ नका, असे सांगितले होते. माझ्या भावाची हत्या केलेल्या आरोपींचे समर्थक आजही मस्साजोगवर लक्ष ठेवून आहेत. ते गावात येतात आणि पाहून जातात. आरोपींना जेव्हा केज न्यायालयात आणले त्या वेळी मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. त्यामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक, आरोपीचे समर्थकही होते. हा विषय आता माझ्या कुटुंबापुरता मर्यादित राहिलेला नाही. सगळ्यांचा विषय झाला आहे. पंकजा मुंडे यांना जर आता यायचे असेल तर मला सगळ्यांना विचारावे लागले,असेही धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT