बाबुराव पाटील
भोकर : आजोबा, वडिल, आई यांचा राजकीय वारसा पुढे चालवत पहिल्याच प्रयत्नात विधासभेच्या भोकर मतदार संघातून भाजपच्या श्रीजया चव्हाण या विजयी झाल्या. विधानसभेतील त्यांचे हे पहिले पाऊल मंत्री म्हणून पडणार का? याकडे भोकरमधील मतदारांचे लक्ष लागले आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या भोकरमधील रिक्त जागेवर त्यांनी मुलगी श्रीजया चव्हाण यांना पक्षाकडून उमेदवारी मिळवून दिली.
एवढेच नाही तर श्रीजयाच्या विजयासाठी पुर्ण शक्ती पणाला लावली. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीला बसलेला धक्का पाहता श्रीजया चव्हाण यांच्या विजयाने भाजप आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी जिल्ह्याच्या राजकारणात कमबॅक केले असेच म्हणावे लागेल. भोकर मतदार संघ पुर्वीपासून काँग्रेसकडे राहिला, राज्यात सर्वाधिक काळ काँग्रेस-आघाडीची सत्ता असल्याने भोकरला कायम मंत्रीपद मिळाले.
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर ही परंपरा कायम राहते का? भोकरला पाचव्यांदा मंत्रीपदाची लाॅटरी लागते का? याची उत्सूकता भोकर आणि नांदेडकरांना लागली आहे. (BJP) 1951 मध्ये भोकर विधानसभा मतदार संघाची निर्मिती झाली आणि पहिल्याच निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिवंगत दिगंबरराव बिंदू यांनी विजय मिळवला. या मतदार संघातून पहिला मंत्री होण्याचा बहुमानही त्यांना मिळाला. त्यानंतर 1957 मध्ये शंकरराव चव्हाण यांनी आपली राजकीय कारकीर्द याच मतदारसंघातून सुरू केली.
सलग चार वेळा त्यांनी या भागाचे प्रतिनिधित्व केले. दरम्यान मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्री पदाचा कारभार त्यांनी सांभाळला. 1990 मध्ये डॉ. माधवराव किन्हाळकर यांना उमेदवारी मिळाली आणि ते विजयी झाले. दुसऱ्यांदा 1995 मध्ये त्यांनी भोकरमधून सलग विजय मिळवला. दरम्यान त्यांनी गृह आणि महसूल विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. 2009 मध्ये मतदार संघाची फेररचना झाल्याने अशोक चव्हाण यांना उमेदवारी मिळाली. त्यांनी सर्वाधिक मते घेऊन निवडून येण्याचा विक्रम केला.
राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा योग त्यांना याच मतदार संघातील विजयाने आणला. याशिवाय सांस्कृतिक, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करण्याची संधीही चव्हाण यांना मिळाली. आतापर्यंत भोकरमधून निवडून आलेल्या चार आमदारांना मंत्री होण्याची संधी मिळाली होती. 'मंत्रीपदाची खान' म्हणून राजकीय क्षेत्रात ओळखल्या जाणाऱ्या या मतदार संघातून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांनी विधानसभेत पहिले पाऊल ठेवले आहे.
राज्यात भाजपा महायुतीला बहुमत मिळाल्याने लवकरच मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर केले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होणार आहे. या मंत्रीमंडळात श्रीजया अशोक चव्हाण यांना स्थान मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. श्रीजया यांना मंत्रीमंडळात संधी मिळाली तर या मतदार संघातील आमदाराला पाचव्यांदा मंत्रीपदाची लाॅटरी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.