VBA News Marathwada Sarkarnama
मराठवाडा

Parbhani VBA politics : `वंचित`चा करिश्मा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही दिसेल का ?

Prasad Shivaji Joshi

Marathwada Political News : गेल्या लोकसभा मतदारसंघात एमआयएमसोबत युती करत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने दमदार कामगिरी केली होती. या पक्षाने छत्रपती संभाजीनगरातून विजय मिळवत महाराष्ट्रातून पहिला खासदार निवडून दिला होता. (Vanchit Bahujan Aghadi News) या शिवाय मराठवाड्यातील नांदेड, परभणीमध्ये युतीच्या उमेदवारांचा विजय सोपा करण्यास हातभार लावला. या शिवाय परभणी, हिंगोली व जालना या तीन जिल्ह्यांतील अकरापैकी पाच विधानसभा मतदारसंघांतील निकालावर `वंचित`ने स्वतंत्रपणे थेट परिणाम केला होता.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ओवेसी आणि आंबेडकरांच्या जोडीने राज्याच्या राजकारणात प्रस्थापित पक्षांना हादरे दिले होते. (Parbhani) परंतु ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या एमआयएम-वंचित आघाडीचा हा संसार जेमतेम सहा महिने चालला आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमसोबतची युती तोडली. (VBA) विधानसभा स्वबळावर लढवण्याचा निर्णय आंबेडकरांनी घेतला आणि याचा फटका दोन्ही पक्षांना बसला.

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप व कॉंग्रेस या प्रस्थापित पक्षांना तिसरा पर्याय म्हणून तयार झालेल्या वंचित बहुजन आघाडीने गेल्यावेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निर्णायक मते घेतली. (Marathwada) संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांना पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवला, तर जालना, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड या सात ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली.

यापैकी नांदेड व परभणी या लोकसभा मतदारसंघांत महायुतीच्या विजयाचा मार्गही वंचित-एमआयएमच्या जोडीने सोपा केला होता. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाने जालना, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांतील दोन विधानसभा मतदारसंघांत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती, तर काही ठिकाणी त्यांचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. एकूण पाच विधानसभा मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीमुळे निकाल बदलले होते.

तीन ठिकाणी नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकरांनी ४८६८०६ मते घेत अशोक चव्हाणांचा पराभव केला होता. या पराभवाला वंचितच्या यशपाल भिंगे यांनी घेतलेली १६६१९६ मते कारणीभूत ठरली. परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या संजय जाधव यांनी विजय मिळवला. राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांचा त्यांनी पराभव केला होता. यातही वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांनी १४९९४६ मते घेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे फाटले आणि आंबेडकरांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. परभणी, हिंगोली व जालना या तीन जिल्ह्यांतील एकूण अकरा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघांच्या निकालावर वंचित बहुजन आघाडीचा थेट परिणाम झाला. घनसावंगी विधानसभा मतदारसंघात राजेश टोपे यांच्या विजयाला वंचितच्या विष्णू शेळके यांनी घेतलेल्या ९२९३ मतांची मदत झाली. ही मते फुटली नसती, तर शिवसेनेच्या हिकमत उढाण यांनी बाजी मारली असती.

कळमनुरी मतदारसंघात संतोष बांगर विजयी झाले होते. या मतदारसंघातली वंचितची जादू दिसून आली होती. त्यांच्या पक्षाच्या अजित मगर यांनी तब्बल ६६१३७ मते मिळवत दुसरे स्थान पटकावले होते. इथे वंचितने शिवसेनेच्या तोंडाला फेस आणला होता. हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये वंचितच्या मुनीर पटेल यांनी २५३९७ मते घेतल्याने राष्ट्रवादीचे राजू नवघरे यांचा विजय सोपा झाला. पाथरी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे सुरेश वरपूडकर यांनाही वंचितची मदत झाली आणि ते १०५६२५ मते घेऊन विजयी झाले होते.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विलास बाबर यांनी २१७४४ मते घेतली होती. जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मेघना बोर्डीकर विजयी झाल्या. राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांचा त्यांनी पराभव केला, पण यात वंचितच्या मनोहर वाकळे यांच्या १३१७२ मतांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. २०१९ च्या तुलनेत राज्यातील राजकीय परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे. शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मुळापासून बदलला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याशी युती झाल्याची घोषणा केली. मात्र, अजूनही दोन्ही पक्षांचे सूर जुळल्याचे कुठेही दिसून आले नाहीत. तसेच भाजपविरोधी `इंडिया` आघाडीच्या बैठकीस प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जाताना वंचित बहुजन आघाडी कोणासोबत असेल किंवा स्वतंत्रपणे वाटचाल करेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT