Chandrakant Khaire, Uddhav Thackeray, Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Khaire-Danve News : पक्ष फुटला, पण वाद संपेना ; खैरे-दानवेंमुळे ठाकरे गटाला फटका बसणार ?

Jagdish Pansare

Khaire-Danve News : अडीच वर्षापुर्वी शिवसेना पक्ष फुटला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदारांनी बंड करत उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद आणि महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकली. भाजपला साथ देत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर काही आमदार मंत्री झाले. या सत्तेच्या जोरावर पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आणि आपलीच शिवसेना खरी असे सागंत त्यांनी लोकसभेच्या निवडणुका लढल्या. राज्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाने स्वबळावर नऊ तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सात जागा जिंकता आल्या.

पक्षफुटीआधी म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते. पक्ष फुटल्यानंतर दोन्ही पक्षाला फटका बसला आणि खासदारांची संख्या दोनने कमी झाली. शिवसेनेचे विभाजन झाले आणि याचा फटका दोघांनाही बसला. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे खासदार झाले. तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचा सलग दुसरा पराभव झाला.

खैरे यांच्या 2019 मधील पराभवानंतर जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यावर त्यांनी खैरेंचे काम केले नाही, असा आरोप करण्यात आला होता. 2024 मधील पराभवानंतरही हा आरोप कायम होता. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मात्र तो मान्य नव्हता, कारण खैरेंच्या पराभवानंतर ठाकरेंनी अंबादास दानवे यांना पक्षात शिवसेनेचे विभागीय नेते पद देत त्यांना बळ दिले. विधानसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातील आठ पैकी पाच जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवली.

तर चंद्रकांत खैरे यांच्या ज्येष्ठत्वाचा आणि एकनिष्ठेचा मान म्हणून शिवसेना नेते पद कायम ठेवत त्यांच्यावर मार्गदर्शकाची जबाबदारी दिली. जिल्हा आणि मराठवाड्याच्या राजकारणात अंबादास दानवे यांचे महत्व वाढल्याने खैरे आणि त्यांचे समर्थक प्रचंड नाराज होते. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलन, मेळाव्यापासून स्वतः खैरे आणि त्यांचे समर्थक अंतर राखून राहू लागले. अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्याविरोधातील नाराजी खैरे वारंवार जाहीरपणे जाहीर करतात, तर दानवे त्याकडे दुर्लक्ष करतात हे अनेकदा दिसून आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्रीवर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. विशेष म्हणजे या बैठकीला अंबादास दानवे हजर होते, तर खैरेंना बैठकीला बोलावण्यातच आले नव्हते. त्यामुळे खैरे यांनी पुन्हा अंबादास दानवे यांच्याकडे बोट दाखवले. खैरे-दानवे हा वाद जिल्ह्यासाठी नवा नाही. गेल्या अनेक वर्षापासून या दोघांमधील कुरबुरी सुरूच आहेत. दोघांमध्ये अनेकदा समेट घडवण्याचे प्रयत्न झाले. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत हे दोघे गळाभेट घेऊन परतता. जिल्ह्यात आले की पुन्हा दोघांची तोंड विरुद्ध दिशेला असतात.

यामुळे स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिकांची मात्र कोंडी होते. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर महत्वाची जबाबदारी मिळाल्यामुळे आता खैरे समर्थकही हळुहळु दानवे यांच्याकडे झुकू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीत अंबादास दानवे यांचाच वरचष्मा दिसला. खैरे समर्थकांना या नियुक्तीत फारसे स्थान देण्यात आलेले नाही. उगवत्या सूर्याला नमस्कार, या प्रमाणे खैरेंचे जुने समर्थकही आता त्यांची साथ सोडू लागले आहे.

मातोश्रीवर पुर्वीसारखे वजन राहिले नाही, जिल्ह्यात विरोधक प्रबळ झाला आहे, तर समर्थक साथ सोडू लागलेत, यामुळे खैरे सध्या चिंतेत आहेत. दोन वेळा आमदार, मंत्री, सलग चार वेळा खासदार राहिलेल्या खैरेंचा जिल्ह्यात मोठा संपर्क आहे. मराठा आरक्षणाचा प्रभाव असताना लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना 2 लाख 93 हजार इतकी मते मिळाली. यावरून त्यांची लोकप्रियता मतदारांमध्ये अजूनही कायम असल्याचे दिसून येते.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खैरे-दानवे यांच्यातील वाद मिटले नाहीत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जिल्ह्यात याचा निश्चितच फटका बसू शकतो. जिल्ह्यातील नऊ पैकी सात जागांवर दावा सांगणाऱ्या ठाकरे गटाला आधी पक्षांतर्गत गटबाजीवर मात करावी लागले, तरच अतिरिक्त जागा आणि त्यानंतर विजयाचे गणित जुळवता येईल. अन्यथा लोकसभेप्रमाणे विधानसभेला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT