Shivsena UBT News Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar Shivsena UBT : लोकसभेतील पराभवाचा डाग ठाकरेंची सेना विधानसभेला धुवून टाकणार ?

Jagdish Pansare

Shivsena UBT Political News : पक्ष फुटल्याची सहानुभूती, सत्ताधारी शिवसेना-भाजपवर गद्दारीचा शिक्का आणि मराठा आरक्षणामुळे राज्यात विशेषतः मराठवाड्यात पेटलेले वातावरण अशा पोषक वातावरणात लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला पराभवाची धुळ चाखावी लागली. एकनिष्ठ विरुद्ध गद्दार असा प्रचार, कट्टर हिंदुत्ववादी उमेदवार देऊनही मतदारांनी बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला सलग दुसऱ्या निवडणुकीत धक्का दिला.

गेल्या पस्तीस वर्षापासून संभाजीनगरवर कायम भगवा फडकवत विजय मिळवणाऱ्या ठाकरेंसाठी यावेळी झालेला पराभव जिव्हारी लागणारा होता. (Shivsena) शिवसेनेच्या राजकीय इतिहासावर या पराभवाने एक प्रकारे डागच लागला. आता विधानसभा निवडणुकीत तरी हा डाग ठाकरेंची शिवसेना संभाजीनगर जिल्ह्यात धुवून टाकणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

लोकसभेतील पराभवानंतर उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे रीघ लागली असली तरी यापैकी विजयाची गॅरंटी देणारे चेहरे किती? हा खरा प्रश्न आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेतील पराभवानंतर पेटून उठलेल्या शिवसैनिकांमुळे जिल्ह्यात सहा आमदार निवडून आले होते. यावेळी 2019 ची पुनरावृत्ती होणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यासाठी पुन्हा एकदा शिवसैनिकांत उत्साह वाढविण्याचे आव्हान पक्षासमोर असेल.

राज्यातील सत्ता बदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जिल्ह्यातील सहा पैकी पाच आमदार गेल्यानंतर शिवसेनेचा (ठाकरे गट) बालेकिल्ला पूर्णपणे ढासळला. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर गेले. (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील एकाही विधानसभा मतदारसंघातून खैरे यांना मतांची लीड मिळू शकली नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये निराशेचे वातावरण आहे.

या पर्श्‍वभूमीवर पक्षाने जिल्ह्यात मेळावे, पक्ष सदस्य नोंदणी, पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू केले. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची नावे घेतली जात आहेत. यावेळी उमेदवारांची मोठी गर्दी होत असली त्यात विजयाचा आत्मविश्वास फारसा दिसत नाही. जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत सरासरी चार ते पाच इच्छुक ठाकरे गटाकडे आहेत. वर्षानुवर्षे युतीत असलेला ठाकरे गट यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढणार आहे.

युतीमध्ये शिवसेनेला पश्‍चिम, मध्य, तसेच पैठण, सिल्लोड, वैजापूर, कन्नड या सहा जागा होत्या. तर भाजपकडे पूर्व, फुलंब्री, गंगापूर या तीन जागा होत्या. यावेळी मात्र महाविकास आघाडीत तीन पक्ष असून, जागा वाटपाचे समीकरण अद्याप ठरलेले नाही. असे असले तरी ठाकरे गटाला मध्य, पश्‍चिम, कन्नड, वैजापूर व पैठण या पाच जागा मिळण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जास्त ताकद नसली तरी लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा जिंकलेल्या काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर मात्र वाढली आहे. काँग्रेसला जास्त जागा देताना काही जागांवर ठाकरे गटाला पाणी सोडावे लागणार असे दिसते.

खैरे-दानवेंना एकत्र आणा..

शिवसेना ठाकरे गटाला दोन नेत्यांच्या गटबाजीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतदेखील चंद्रकांत खैरे व अंबादास दानवे यांच्यातील गटबाजीचा फटका पक्षाला बसणार आहे. अंबादास दानवे यांच्यामुळे ठाकरे गटात होणाऱ्या प्रवेशावर चंद्रकांत खैरे उघडपणे विरोध करीत आहेत. भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा प्रवेश खैरे यांना रुचलेला नाही. त्यामुळे पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटात दानवे व खैरे गट आतापासूनच सक्रिय झाले.

जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी ऐकावे तरी कोणाचे, अशी अवस्था आहे. तेव्हा आधी खैरे-दानवेंना एकत्र आणा, असा काहीसा सूर शिवसैनिकांमधून निघतो आहे. दरम्यान, जिल्ह्यातील तब्बल पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने `गद्दारांचा पराभव` हाच ठाकरे गटाचा विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार आहे. या पाचही मतदारसंघांत पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार? की बाहेरच्या पक्षातून आलेले, व तेच ते उमेदवार ? यावरही यशाचे गणित अवलंबून असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT