Nagpur Winter Session Sarkarnama
मराठवाडा

Nagpur Winter Session : दिवसाढवळ्या पडणारे खून, महिलांवरील अत्याचार, दंगली राज्यासाठी भूषणावह नाहीत...

Jagdish Pansare

Ambadas Danve News : नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे चांगलेच आक्रमक झाले होते. राज्यातील ढासळती कायदा व सुव्यवस्था, भ्रष्टाचार आणि आरोग्याच्या विषयावर दानवे सरकारवर अक्षरशः तुटून पडले. (Nagpur Winter Session) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये वाढलेल्या गुन्हेगारी कारवायांवरूनही त्यांनी निशाणा साधाला.

राज्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्था, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारात झालेली वाढ आणि ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेवर भाष्य करताना दानवे म्हणाले, सरकार जनतेच्या मुळावर व शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. (Nagpur) शेतकऱ्यांना विमा अनुदानाव्यतिरिक्त एकही रुपयाची मदत जाहीर केली नाही. विदर्भातील संत्री उत्पादक शेतकऱ्यांना कोणतेही पॅकेज दिले नाही. (Maharashtra) हे सरकार भ्रष्टाचाराच्या गर्तेत सापडले असून राज्याला विकासापासून दूर नेण्याचे काम हे सरकार करत आहे.

शेतकरीविरोधी, मराठा समाजाला आरक्षण देण्यास असमर्थ ठरलेले हे सरकार कायदा व्यवस्थेचे भक्षक आहे. (Shivsena) राज्यात संघटित गुन्हेगारीत झालेली वाढ, दिवसाढवळ्या होत असलेले खून, महिला अत्याचार, राज्यात मोठया प्रमाणात झालेल्या दंगलीच्या घटना या सर्व राज्याला भूषणावह नाहीत, अशा शब्दांत त्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणात सरकारवर आसूड ओढले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाच वर्षांपासून भाजपची सत्ता असतानाही आजही विदर्भाच्या प्रश्नांवर, विकासावर ठोस व कालबध्द कार्यक्रम सरकारने जाहीर केला नाही. गेले ५ वर्षे विदर्भाचा अनुशेष बाकी का आहे? विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहेत. नागपूरमध्ये महिला अत्याचार, खून दरोडे या सारख्या गुन्ह्यांत वाढ झाली असून येथील तरुण पिढी ही व्यसनाधीनतेकडे वळते आहे. खुद्द गृहमंत्री नागपूरचे पालकमंत्री असूनही त्यांच्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यास ते अपयशी ठरल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.

सरकार हे टक्केवारी व भ्रष्टाचाराचे काम करत असून जनतेच्या हिताचे कोणतेही काम करत नसल्याचा घणाघातही त्यांनी केला. मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणात सुरू असलेली लूट, रखडलेल्या पालिका निवडणुका, सिडकोने 67 हजार घरांची विक्री करण्यासाठी खासगी संस्थेसाठी 699 कोटी रुपयांची काढलेली निविदा याकडेही दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

तसेच मुंबई महापालिकेप्रमाणे नागपूर, पुणे महापालिकांचीही चौकशी करावी, अशी मागणी दानवे यांनी केली. राज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स कारखान्यांवर कारवाई झाली. ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी जेल अधीक्षकावरही कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी भाषणात केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT