छत्रपती संभाजीनगर : शिवसैनिक तक्रारी करतात, आम्ही त्यांच्या पाठीशी नाही म्हणतात. कशाला मला आणि (Chandrakant Khaire) चंद्रकांत खैरेसाहेबांना बदनाम करतात? मला एक सांगता तिकडे खैरेसाहेंबाना जाऊन दुसरं सांगता. हे करणारे तुम्हीच, शिवसैनिक काही कमी नाही, अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्यात शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांचीच खरडपट्टी काढली.
मी आणि खैरेसाहेब दोघेही पक्षाचेच काम करतो, ते त्यांचे करतात, मी माझे करतो, आम्हाला काम करू द्या. आम्ही दोघे एकत्र एकाच व्यासपीठावर येत नाही, आज बऱ्याच दिवसांनी आलो एवढेच. आम्ही दोघेही तुमच्या पाठीशीच आहोत, त्यामुळे विनाकारण आम्हाला बदनाम करू नका, असे आवाहनही (Ambadas Danve) अंबादास दानवे यांनी केले.
सलग दोन लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर छत्रपती संभाजीनगरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्ह्यातील दोन नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांना आधी एकत्र आणा, त्यांच्यातील वाद मिटवा असे गाऱ्हाणे गुरुवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिवसैनिकांनी मांडले होते.
उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही नेत्यांना कानपिचक्या दिल्या अन् आज खैरे-दानवे यांनी शिवसैनिकांचा एकत्र मेळावा घेतला. या मेळाव्यात अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांवरच आगपाखड केली. उद्धव ठाकरे यांच्याकडे झालेल्या तक्रारीचा राग त्यांनी आजच्या मेळाव्यात शिवसैनिकांवर काढल्याची चर्चा त्यांच्या भाषणानंतर सुरू झाली आहे. शिवसैनिक काही कमी नाहीत, ते खैरेंकडे जाऊन वेगळ सांगतात अन् माझ्याकडे येऊन एक सांगतात.
खैरेसाहेब 70-75 वर्षांचे झाले आहेत, ते ऐकतात, पण मी एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो. आमच्या पाठीशी उभे राहा असं तुम्ही म्हणता, मग मी-खैरेसाहेब कोणाच्या पाठीशी आहे? तुम्ही तुमचेचं पळता का? आम्ही शिवसेनेसाठी काम करत नाही तर मग कोणासाठी करतो?
इकडचं तिकडं करणारे तुम्हीच आहात, आता हे बंद करा, असे आवाहन अंबादास दानवे यांनी यावेळी केले. एका पराभवाने खचून जाऊ नका, उद्या पक्षाने ठरवले की महापालिका निवडणुका लढवायच्या नाहीत, तर शिवसेना, शिवसैनिक लोकांची काम करणे बंद करतील का? असा सवालही अंबादास दानवे यांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.