
माधव इतबारे
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंचे नेतृत्व आणि ठाकरे ब्रॅन्ड पाठीशी असूनही राज्यात आणि छत्रपती संभाजीनगर या हक्काच्या बालेकिल्यात पक्षाला गळती लागली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पाच वर्ष सत्तेविना कसे राहावे? या विचारातून वर्षानुवर्ष सत्ता, पदे भोगलेले उद्धवसेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आतापर्यंत सात माजी महापौरांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे.
डझनभर माजी नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. पण हे सगळं रोखण्याची जबाबदारी ज्या शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, (Ambadas Danve) अंबादास दानवे यांच्यावर आहे, त्यांचा तोरा मात्र कायम आहे. या दोन नेत्यांच्या गटबाजीला कंटाळूनच पक्ष रिकामा होत आहे, पण याकडे ना खैरे-दानवेंचे लक्ष आहे, ना पक्षप्रमुपख उद्धव ठाकरेंचे. अशाने जिल्ह्यात मशाल कशी पेटणार? असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांना निश्चितच पडतो. पक्षातून गेल्या अडीच वर्षांपासून 'आऊट गोईंग'सुरू आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व पुढील पाच वर्षे सत्तेविना राहावे लागणार असल्याने पक्षात कोणी थांबण्यास तयार नाही. पक्षाची कधी नव्हे एवढी पडझड होत असताना नेते मात्र घरात बसून असल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शहरावर विशेष प्रेम होते. बाळासाहेब ठाकरे यांनी शहराचे नाव संभाजीनगर करू, असे जाहीर केले, त्यानंतर महापालिका निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाले.
दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने शिवसेनेला भरभरून दिले. महापालिकेत सुमारे 25 ते 30 वर्षे युतीची सत्ता होती. त्यात बहुतांश महापौर शिवसेनेचे होते. खासदार, आमदारांमध्ये शिवसेनेचाच वरचष्मा होता. मात्र अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड झाले आणि चाळीसहून अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. तेव्हापासून राज्यासह जिल्ह्यातही शिवसेनेची वाताहत सुरू आहे. शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार, पदाधिकारी गद्दार असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने केला जात होता, पण जनतेने आता हा मुद्दा निकाली काढला आहे.
शिंदे गटाला जिल्ह्यात मिळालेले यश पाहता व गेल्या अडीच वर्षात जिल्ह्यातील आमदारांना मिळालेला निधी पाहून स्वतःला निष्ठावान म्हणवणारे पदाधिकारी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत आहेत. आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका पाहता ठाकरे गटातील माजी नगरसेवक, पदाधिकारी आपल्याकडे ओढून घेण्यासाठी शिंदे गट व भाजपमध्ये चढाओढ लागली आहे. आमदार प्रदीप जैस्वाल, माजी आमदार किशनचंद तनवणी यांच्यासह तब्बल सात माजी महापौर सध्या शिंदे गटात आहेत. आणखी दहा माजी नगरसेवक प्रवेशाच्या तयारीत आहेत.
प्रत्यक्षात निवडणुका जाहीर झाल्यानंतर पक्षाला 'जय महाराष्ट्र'करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकही जागा ठाकरे गटाला जिंकता आलेली नाही. अंबादास दानवे अनेक वर्षांपासून जिल्हाप्रमुख पदाला चिकटून आहेत. विरोधीपक्षनेते पदाएवढी पक्षातील सर्वांत मोठी जबाबदारी मिळाल्यानंतरही जिल्हाप्रमुख पदामध्ये असे काय आकर्षण आहे? जे दानवे यांना सोडविल्या जात नाही, असा सवालही या निमित्ताने केला जातोय.
राज्यभर दौरे करून विरोधकांवर आरोप करणाऱ्या दानवे यांची `बुडाखाली अंधार'अशी अवस्था झाली आहे. दानवे व दुसरे नेते चंद्रकांत खैरे यांच्यातील गटबाजी जगजाहीर असून याला कंटाळलेले पदाधिकारी, माजी नगरसेवक आता पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. विशेष म्हणजे यातील यातील अनेकांनी 'मातोश्री'च्या जिवावर वर्षानुवर्षे सत्ता भोगलेली आहे, पण त्यांना थांबविण्यासाठी कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची सध्याची अवस्था 'बुडत्याचा पाय खोलात'अशीच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.