Walmik Karad-Balaji Tandle Sarkarnama
मराठवाडा

Walmik Karad : ‘होय, वाल्मिक कराड माझे परिचित; पण आमची...’ ; बीड पोलिस ठाण्यात पोचलेल्या माजी सरपंच बालाजी तांदळेंचे मोठे खुलासे

Santosh Deshmukh Murder Case : मी तब्बल तीन ते साडेतीन तास बीड पोलिस ठाण्यात होतो, पण आमची भेटही झालेली नाही. मी वाल्मिक कराडचा किती जवळचा आणि दूरचा आहे, हे बाहेरच्यांनी सांगण्याची गरज नाही. कराड हे माझ्या परिचित आहेत, हे मी नाकारणारच नाही.

Vijaykumar Dudhale

Beed, 03 January : बीडच्या पोलिस ठाण्यात मी वाल्मिक कराडला भेटायला गेलो नव्हतो, तर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी मला चौकशीसाठी बोलावले होते. आमची भेट झालीच नाही. कराडला ज्या ठिकाणी ठेवले आहे, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, त्यामुळे तेही तपासावेत. माझ्यामध्ये आणि धनंजय देशमुख यांच्या कोणतेही भांडण झालेले नाही, असा खुलासा माजी सरपंच बालाजी तांदळे यांनी केला आहे.

माजी सरपंच बालाजी तांदळे यांनी बीड पोलिस ठाण्यात जाऊन वाल्मिक कराड (Walmik Karad) यांची भेट घेतल्याचा आरोप मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला होता. त्यावर बालाजी तांदळे यांनी आज खुलासा केला. ते म्हणाले, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी बोलावल्यामुळे मी बीड पोलिस ठाण्यात त्यांच्यासोबतच चौकशीसाठी गेलो होते. सीआयडीने मला एका खोलीत बसवले, त्याच ठिकाणी माझी चौकशी झाली. त्यांनी मला काही प्रश्न विचारले, मी उत्तरे दिली.

बालाजी तांदळे म्हणाले, मला सकाळी सीआयडीच्या अधिकाऱ्यांचा ‘चौकशीला या’ असे सांगण्यासाठी फोन आला होता. ‘मी अर्ध्या एक तासात येतो,’ असे स्पष्ट केले. मात्र, त्यांनी ‘तुम्ही गावीच थांबा आम्ही त्या ठिकाणी येतो,’ असे स्पष्ट केले. तयार झाल्यानंतर मी पोलिस अधिकऱ्यांना फोन केला तर त्यांनी मला केजला यायला सांगितले. केजला गेल्यानंतर त्यांनी आपल्याला बीडला (Beed) जायचं आहे, असे सांगितले. त्यामुळे मी सीआयडीच्या अधिकाऱ्यांसोबत बीडला गेलो होतो. बीडमध्ये माझी तीन तास चौकशी झाली.

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी माझं कोणतंही भांडण झालं नाही. मी स्वच्छतागृहातून बाहेर आल्यानंतर समोर धनंजय देशमुख दिसले. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘ तू कसं काय इकडं आला. तुझ्या चेहऱ्यावर लय टवटवी दिसते.’ त्यावर मला सीआयडीच्या पथकाने चौकशीसाठी बोलावले होते. म्हणून मी पोलिस ठाण्यात आलो आहे. मी काय कोणाला भेटायला वैगेरे आलेलो नाही, असे मी धनंजय यांना सांगितले, असेही तांदळे यांनी म्हटले.

तांदळे म्हणाले, मी आणि धनंजय बोलत असताना रेळेकर नावाच्या महिला अधिकाऱ्यांनी मला ‘तुम्ही कोण आहात, तुमचा इथं येण्याचा काय संबंध आहे,’ अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांनाही मी सीआयडीने बोलावल्याचे सांगितले. त्याचवेळी वरिष्ठ अधिकारी दराडे यांनी मला एका खोलीत बसण्यास सांगितले. मी तब्बल तीन ते साडेतीन तास पोलिस ठाण्यात होतो, पण आमची भेटही झालेली नाही. मी वाल्मिक कराडचा किती जवळचा आणि दूरचा आहे, हे बाहेरच्यांनी सांगण्याची गरज नाही. वाल्मिक कराड हे माझ्या परिचित आहेत, हे मी नाकारणारच नाही.

वाल्मिक कराडला ज्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे, त्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत, त्यांनी तपासणी करावी. माझी आणि त्याची भेटच झाली नाही. मी खोट बोलत असेन पण सीसीटीव्ही तर खोटं बोलणार नाही ना. मला सीआयडीने चौकशीसाठी बोलावलं होतं, असेही त्यांनी नमूद केले.

सीआयडीने मला चौकशीसाठी का बोलावलं, हे मला काही माहिती नाही. संतोष देशमुख खून प्रकरणातील तीन फरारी आरोपींचा तुम्हाला फोन आला होता का. ते कोणाच्या संपर्कात आहेत. तीन फरारी आरोपींपैकी मी सुदर्शन घुले याला ओळखतो. त्याच्याशी गेल्या चार महिन्यांपासून म्हणजेच लोकसभा निवडणुकीपासून ओळख आहे, असेही तांदळे यांनी स्पष्ट केले.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा आरोपींशी वाद झाला होता. त्यानंतर माझी आणि देशमुख यांची भेट झाली होती. कशामुळे भांडण झाले. काय झालं याची चौकशी केली होती, असाही खुलास तांदळे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT