
छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण तापले आहे. या घटनेशी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री (Dhananjay Munde) धनंजय मुंडे आणि त्यांचे राईट हॅंड समजले जाणारे वाल्मिक कराड यांचा संबंध जोडला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर एकवीस दिवसांनी दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल असलेला वाल्मिक कराड पुणे येथे पोलिसांन शरण आला आहे. त्याला 14 दिवसांची पोलिस कोठडी केज न्यायालयाने सुनावली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते (Ambadas Danve) अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवा, अशी मागणी केली आहे. वाल्मिक कराड याची दहशत आणि पोलिस खात्यात असलेला दबाव पाहता या हत्या प्रकरणाचा खटला बीडमध्ये चालवणे योग्य ठरणार नाही.
वाल्मिक कराड हा अनेकदा पोलिसांना आदेश द्यायचा. मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोघे एकाच नाण्याच्या बाजू आहेत, असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्याबाहेर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर किंवा पुणे येथे चालवला पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे सांगितले.
वाल्मिक कराड याचा खटला लढवण्यास नकार देणाीऱ्या सरकारी वकील देशपांडे यांनी खटला लढायला नकार दिला. ते घाबरले का? त्यांनी नकार का दिला? याची सरकारने चौकशी केली पाहिजे. केज पोलीस वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करायला तयार नव्हते, असा दावा करतानाच या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राज्य सरकारची स्वतंत्र टीम असली पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली. ज्या ठिकाणी पोलिसच आरोपीसोबत उठबस करतात तिथे काय चौकशी होणार? वाल्मिक कराड बिनधास्त राहत आहे हे त्याच्या देहबोलीवरून दिसते आहे, असेही दानवे म्हणाले.
या प्रकरणात सर्व संशयितांचे सीडीआर रिपोर्ट चेक करून कारवाई केली पाहिजे. सुरेश धस ज्यांचा आका म्हणून उल्लेख करतात त्यावरून त्यांचा इशारा कोणाकडे हे स्पष्ट आहे. आका कोण हे सगळ्यांना माहीत आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे संबंध सर्वांना माहीत आहे. वाल्मिक कराड नागपूर अधिवेशन काळात नागपूरात एका फार्महाऊसवर राहत असल्याचा दावा मी केला होता. एवढे सांगूनही पोलिसांनी मला अधिक माहीतीसाठी फोन केले नाही.
वाल्मिक कराड विधिमंडळ अधिवेशन सुरू असतांना नागपूरात कोणाला भेटायला आला होता? ज्यांना भेटायला आला होता, ते तीन दिवस अधिवेशनातून गायब होते. तुमचा या घटनेशी संबंध नसेल तर तुम्ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणीही अंबादास दानवे यांनी केली. सरकार वाल्मिक कराडला वाचवत होते, राजकीय वरदहस्त असल्यावर काय होऊ शकते? या प्रकरणात दिसून आले, असेही दानवे यांनी यावेळी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.