Beed Crime : बीड जिल्ह्यात 'राखे'तून माफिया-गुंडांची कायदे पायदळी तुडवणारी 'भरारी"

Santosh Deshmukh Murder Case : फिनिक्स पक्षी राखेतून भरारी घेतो. तसे पाहिले तर राखेतून बीड जिल्ह्यानेही भरारी घेतली आहे, मात्र ती भरारी गुंडगिरीची, कायदे पायदळी तुडवणारी आहे. क्रांति सिंह नाना पाटील, रामचंद्र परांजपे अशा चळवळीतील नेत्यांनी एकेकाळी बीडची खासदारकी भूषवली होती. त्या बीडमध्ये आज थर्मल प्लँटच्या राखेतून हजारो कोटींची उलाढाल आणि त्यातून गुंडगिरी पोसली जात आहे
Santosh Deshmukh, Anjali Damaniya, Walmik Karad
Santosh Deshmukh, Anjali Damaniya, Walmik KaradSarkarnama
Published on
Updated on

Beed News: क्रांतिसिंह नाना पाटील सर्वांनाच माहित आहेत. ते बीडचे खासदार होते, हे सर्वांनाच माहित असेल का, याबाबत शंकाच आहे. रामचंद्र परांजपे, द्वारकादास मंत्री, गंगाधरअप्पा बुरांडे, बबनराव ढाकणे असे दिग्गज खासदार बीडला लाभले. हे सर्व नेते चळवळीतून पुढे आलेले. क्रातिंसिंह नाना पाटील यांचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग होता. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार स्थापन केले होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून 1967 मधून ते बीड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.

दिग्गज, विचारवंत, प्रामाणिक खासदारांची परंपरा असलेल्या बीड जिल्ह्याची आज काय अवस्था झाली आहे, हे अख्खा महाराष्ट्र पाहतो आहे. बीड करांसाठी हा प्रवास निश्चितच निराशा जनक असा आहे. बीड जिल्ह्यातील गुंडगिरीची चर्चा आधीही व्हायची, मात्र मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर समोर येणाऱ्या बाबी हादरवून टाकणाऱ्या आहेत.

1995 नंतर बीड जिल्ह्यात गुंडगिरीने अक्राळ-विक्राळ स्वरूप धारण केले. फीनिक्स पक्षी राखेतून यशस्वी भरारी घेतो, तशी बीड जिल्ह्यानेही राखेतून भरारी घेतली, मात्र ती गुंडगिरीकडे, दहशतीच्या वातावरणाकडे! ही राख थर्मल पॉवर प्लँटची!

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आष्टीचे (जि. बीड) भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात वाचा फोडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात वाल्मीक कराडे याचे नाव घेत त्याच्या काळ्या कृत्यांची यादी सादर केली.

आमदार धस यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यात ते म्हणाताहेत, गोपीनाथ मुंडे साहेबांनी मटक्याचा खटका बसवला, मुंबईतील गँगवॉर बंद केले. मग प्रश्न असा आहे, की गोपीनाथ मुंडे यांना बीडमधील गुंडगिरी का संपवता आली नाही?

कोणताही शहाणा, प्रामाणिक अधिकारी बीड जिल्ह्यात काम करत नाही, तु्म्हाला बीड जिल्ह्यात कुणी विनाकारण धक्का दिला तरीही त्याला जाब विचारायचा नाही... अशी वाक्ये गेल्या अनेक वर्षांपासून कानावर पडत आहेत. अन्य भागातील कोणत्याही माणसाला हे अतिरंजित वाटू शकते, वाटतही असे, कारण गुन्हेगारी, गुंडगिरी सगळी कडे कमी-अधिक प्रमाणात असते.

बीडची परिस्थिती मात्र वेगळी आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यानंतरच्या घडामोडी, त्यानंतर बाहेर येत असलेली माहिती धक्कादायक आहे. या वाढत्या गुन्हेगारीला परळीतील थर्मल प्लँटच्या राखेच्या टेंडरचाही संदर्भ आहे.

विधानसभेच्या निवडणुकीतील परळी मतदारसंघातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना तो व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ पाहिला की बीड जिल्ह्यातील गुंडगिरी आणि त्याची लोकांवर किती दहशत आहे, याचा अंदाज येऊ शकतो.

हे देखिल वाचा

Santosh Deshmukh, Anjali Damaniya, Walmik Karad
Ambadas Danve On Beed Murder Case : वाल्मिक कराड पोलिसांना आदेश द्यायचा, संतोष देशमुख खून खटला बीड बाहेर चालवा!

या पाठोपाठ अंजली दमानिया यांनी परळी थर्मल प्लँटमधील राखेबाबतही एक ट्वीट केले आहे. ही राख म्हणजे एक प्रकारचे सोनेच आहे. ही राख उचलण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाते. मात्र निविदा भरणाऱ्यांना राख उचलूच दिली जात नाही, असे दमानिया यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

राजकीय नेत्यांचे पाठबळ, त्यामुळे पोलिसांममध्ये निर्माण होणारी निष्क्रियता, संबंधित समुदाय, पक्षातील लोकांकडून केले जाणारे गुंडगिरीचे, भाईगिरीचे उदात्तीकरण आदी कारणांमुळे गुन्हेगारी वाढते, हे सर्वज्ञात आहे. बीडमध्येही यापेक्षा काही वेगळे झालेले नाही.

आपल्या आवडत्या नेत्यांना कार्कर्त्यांकडून किंग, राजा आदी विश्लेषणे लावली जात आहेत. एका अर्थाने कार्यकर्त्यांनी स्वतःहून गुंडगिरी लादून घेतली आहे, असे दिसून येत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करणारा वाल्मिक कराड आता धनंजय मुंडे यांचा उजवा हात बनला आहे, हे लपून राहिलेले नाही.

वाल्मिक कराडच्या अटकेनंतर थर्मल प्लँटच्या राखेचा मुद्दाही समोर आला आहे. ही राख उचलण्यासाठी दहशत निर्माण केली जाते. प्रचंड गुंडगिरी केली जाते. राख उचलण्याचा ठेका 17 कंपन्यांना मिळाला आहे. अंजली दमानिया यांनी त्या कंपनीच्या नावांची यादीही ट्वीट केली आहे.

पण त्या कंपन्यांना राख उचलण्यासाठी आत जाऊ दिले जात नाही, असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. तक्रार देऊनही पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. गुंडांच्या मार्फत दहशत निर्माण केली जाते, असाही आरोप त्यांनी केला आहे. दमानिया यांचा रोख कुणाकडे आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

पत्त्यांचे क्लब, वाळू, पवनचक्की आणि थर्मल प्लँटच्या राखेतून बीड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून माफिया तयार झाले आहेत. थर्मल प्लँटमध्ये फ्लाय अॅश आणि बॉटम अॅश तयार होते. 80 टक्के फ्लाय अॅशचा ठेका सिमेंट कंपन्यांना दिला जातो.

छोट्या कंपन्यांना 20 टक्के फ्लाय अॅश दिली जाते. गुंडगिरी होते ती बॉटम अॅशसाठी. बॉटम अॅशचा वापर रस्ते, महामार्गांच्या उभारणीसाठी केला जातो. ठेका घेणाऱ्यांनाही परळीत ही अॅश घेऊ दिली जात नाही. यातून वर्षाकाठी 1000 कोटी रुपयांची उलाढाल होते, असे सांगितले जाते.

Santosh Deshmukh, Anjali Damaniya, Walmik Karad
Walmik karad : 'कोठडीत 24 तास मदतनीस हवा...'; नवीन बेडचा वाद सुरू असतानाच वाल्मिक कराडची मोठी मागणी

परळी परिसरात गुंडगिरी, दहशत वाढण्यासाठी हे थर्मल प्लँट म्हणजे औष्णिक वीज निर्मिती केंद्र प्रमुख कारण ठरले. काही लोकांनी 1995 नंतर या केंद्रावर ताबा घेतल्याचे सांगितले जाते. त्यातून त्यांना अफाट पैसा मिळाला, अजूनही मिळतोच आहे.

अफाट पैसा, राजकीय वरदहस्त आणि सत्तेची ताकद यामुळे बीड जिल्ह्याची घडी विस्कटून गेली आहे. बीड जिल्ह्याचा क्राइम रेट राज्यात सर्वाधिक आहे, असे सांगितले जाते. अगदी साध्या कारणांवरूनही एकमेकांचे खून पाडण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत.

क्रांतिसिंह नाना पाटील हे 1967 ते 1971 पर्यंत बीडचे खासदार होते. त्यांच्यापूर्वी रामचंद्र परांजपे खासदार होते. परांजपे हे हैदराबात मुक्तिसंग्राम लढ्यातील सेनानी. अशा अनेक दिग्गजांना बीड जिल्ह्यातील मतदारांनी लोकसभेत पाठवले होते.

आज बीड वेगळ्याच, नको त्या कारणांसाठी ओळखला जात आहे. बीड जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही ओळख अत्यंत वेदनादायी आहे. बीडमध्ये जे सुरू झाले आहे, ते थांबणार आहे की त्याचे लोण शेजारच्या जिल्ह्यांसह राज्यभरात पसरणार आहे, अशी भीती आता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com