Parbhani ZP Election : परभणी झेडपीमध्ये भाजपा हा सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष ठरला आहे. परंतू अध्यक्षपद आणि सत्तेसाठी आवश्यक असलेल्या बहुमतासाठी त्यांना शिवसेनेच्या कुबड्या घ्याव्या लागणार आहेत. पण हे करताना महायुतीतील तिसरा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याची रणनीती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आखली आहे. बहुमत आणि अध्यक्षपदासाठी शिवसेनेची मदत भाजपाला घ्यावीच लागणार आहे. राज्यात भाजपा-शिवसेना युती असल्याने हे दोन्ही पक्ष एकत्र येणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अलिकडील निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून, अध्यक्षपदावर भाजपाचाच दावा मजबूत मानला जात आहे. शिवसेना (शिंदे गट) यांच्यासोबत युतीची शक्यता गृहीत धरली जात असून, दोन्ही पक्षांची आघाडी झाल्यास अध्यक्षपद भाजपकडे जाण्याची दाट शक्यता आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी 18 मार्च रोजी दुपारी 2 वाजता विशेष सभा होणार आहे. त्यासाठीचा अधिकृत कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. या सभेस अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव या पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांची नामांकनपत्रे सभेच्या वेळेच्या दोन तास अगोदर स्वीकारली जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या टप्प्यावरही राजकीय रणनीती आखली जात असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, 10 मार्च रोजी दुपारी 2 वाजता जिल्ह्यातील सर्व नऊ पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती निवडीसाठी विशेष सभा घेण्यात येणार आहे. संबंधित तालुक्यांतील नियुक्त अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडणार असून, पंचायत समित्यांतील निकालांचा जिल्हा परिषद सत्तासमीकरणांवर अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
भाजप व शिवसेना (शिंदे गट) या संभाव्य युतीकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील सक्षम व संघटनात्मक पकड असलेल्या सदस्याला पुढे करण्याबाबत चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांकडूनही एकत्रित उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू असून, निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंचायत समित्यांमध्ये परभणी, सेलू व गंगाखेड येथे सर्वसाधारण, जिंतूर, मानवत व पालम येथे सर्वसाधारण महिला, पूर्णा येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग, पाथरी येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तर सोनपेठ येथे अनुसूचित जाती महिला आरक्षण लागू आहे.
या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून, काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्या बळ, आघाड्यांचे गणित, तसेच अंतर्गत गटबाजी यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय समीकरण बदलू शकतात. काही सदस्य 'किंगमेकर'च्या भूमिकेत राहण्याची शक्यता असल्याने त्यांच्याकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे.
10 मार्चला पंचायत समित्या आणि 18 मार्चला जिल्हा परिषद या दोन्ही निवडींनंतर जिल्ह्यातील सत्तासमीकरणे स्पष्ट होणार असून, पुढील पाच वर्षांच्या विकास धोरणाची दिशा त्यावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्याचे राजकारण सध्या निर्णायक टप्प्यावर आले आहे. परभणी जिल्हा परिषदेत सर्वाधिक 24 सदस्य निवडून आणत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेचे पाच सदस्य निवडून आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे 15, काँग्रेसचे तीन तर एक जागा अपक्षाच्या खात्यात गेली आहे.
भाजपकडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या जिंतूर मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सांवगी म्हाळसा गटातून विजयी झालेल्या लता वाकळे यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर वर्णी लागणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवत शिवसेनेच्या मदतीने झेडपीवर आपले वर्चस्व कायम राखण्याचा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा प्रयत्न असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.