Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Vidhan Parishd Election : विधान परिषदेसाठी भाजपची जुन्यांनाच लॉटरी की पुन्हा धक्कातंत्र? 14 महिन्यांसाठी आमदारकीची संधी मिळालेल्या 'त्या' तिघांची धाकधूक वाढली

MLC Election 2026 News : राज्यातील विधान परिषदेच्या नऊ जागेसाठी निवडणुकीची घोषणा होताच आता सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे. 12 मे रोजी मतदान होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील विधान परिषदेच्या नऊ जागेसाठी निवडणुकीची घोषणा होताच आता सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे. 12 मे रोजी मतदान होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सर्वाधिक पाच जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजपकडून राज्यसभेप्रमाणे धक्कातंत्राचा अवलंब केला जाणार का? जुन्यांनाच लॉटरी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच 14 महिन्यांसाठी आमदारकीची संधी मिळालेल्या दादाराव केचे, संदीप जोशी व संजय केणेकर या तिघांची धडधड वाढली आहे.

राज्यातील राज्यसभेच्या सात जागेसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपच्या वाट्याला चार जागा आल्या होत्या. त्यावेळी भाजपने धक्कातंत्राचा अवलंब करीत मराठवाड्यातील धनगर समाजाचा मोठा चेहरा असलेले रामराव वडकुते यांना राज्यसभेवर पाठवून भाजपने सर्वांनाच चकित केले होते. तर विदर्भातील गडचिरोली-चिमूर पट्ट्यातून येणाऱ्या आदिवासी समाजाच्या महिला नेत्या डॉ. माया इवनाते यांना संधी दिली होती. या दोघांची नावे चर्चेत नसताना संधी देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याशिवाय केंद्रीय मंत्री व रिपाई नेते रामदास आठवले, माजी मंत्री विनोद तावडे यांना राज्यसभेवर घेतले होते. त्यामुळे आता विधान परिषदेसाठी उमेदवारी देताना पुन्हा एकदा भाजपकडून जुन्या-जाणत्या नेत्यांना संधी दिली जाणार का? नव्या चेहऱ्याला रिंगणात उतरवले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीवेळी अनेक दिग्गज नेत्यांना डावलून भाजपने थेट तळागाळातील आणि समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना संधी दिली होती. त्यामुळेच राज्यसभेप्रमाणेच आता विधान परिषदेच्या 9 जागांसाठी भाजपमध्ये (BJP) 'सस्पेन्स' वाढला आहे. विभागवार व जातीय समीकरणाचा समतोल साधत उमेदवारी दिली जाते त्यामुळे या घोषणेकडे लक्ष लागून राहिले आहे.

विधान परिषदेची निवडणूक 14 मे 2020 रोजी बिनविरोध झाली होती. यावेळी भाजपच्या कोट्यातील चार जागांवर प्रवीण दटके (मध्य नागपूर), रमेश कराड (लातूर ग्रामीण) आणि गोपीचंद पडळकर (जत) हे नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभेवर निवडून गेले. त्यामुळे या तीन जणांच्या जागा रिक्त झाल्या होत्या. या रिक्त झालेल्या तीन जागांवर माजी आमदार दादाराव केचे, संदीप जोशी आणि संजय केणेकर यांना संधी मिळाली पण त्यांच्या आमदारकीचा 14 महिन्यांचाच कार्यकाळ संपला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे पीए राहिलेले सुमित वानखेडे यांना वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदार संघामधून भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्यावेळी भाजप आमदार दादाराव केचे यांना थांबावे लागले होते. त्यामुळे त्यांना विधानपरिषदेची संधी बक्षिसी म्हणून मिळाली होती. त्यावेळी १४ महिन्यांची विधान परिषद आमदारकी देत केचे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणार का याबाबत सस्पेन्स कायम आहे.

दुसरीकडे सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा करून संदीप जोशी यांनी गेल्या जानेवारीमध्ये खळबळ उडवून दिली होती. सीएम देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. त्यांना नागपूर पदवीधर मतदारसंघातून तयारी करण्यास सांगितले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील संजय केणेकर हे तीनवेळा नगरसेवक तर एकवेळा उपमहापौर होते. 38 वर्षांपासून ते भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना विभागवार समीकरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केल्यास व नुकत्याच झालेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीतील भाजपच्या विजयाचे बक्षीस म्हणून संधी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे.

गेल्यावेळी भाजपकडून आमदार झालेले सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांना पूर्ण सहा वर्षांचा कार्यकाळ मिळाला आहे. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींमध्ये ते भाजपपासून दुरावले. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी दिली जाणार का? याबाबत सस्पेन्स कायम आहे.

'या' दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत

भाजपकडून विधान परिषदेच्या या पाच जागेसाठी संजय केणेकर, माजी आमदार राम सातपुते, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रमोद जठार, केशव उपाध्ये, राजेश पांडे, विवेक कोल्हे यांची नावे चर्चेत आहेत तर महिला नेत्याचा विचार करता माधवी नाईक, विजया रहाटकर यांच्यापैकी एकीला संधी मिळू शकते. त्यामुळे आता कोणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT