

Shivsena-Congress News : परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आघाडीची सत्ता येऊन इकबाल शेख हे महापौर पदी विराजमान झाले. शिवसेनेने मुस्लिम महापौर केल्याने विरोधक त्यांच्यावर तुटून पडले होते. परंतु, या विरोधाला न जुमानता खासदार संजय जाधव आणि काँग्रेसच्या शहर अध्यक्षांनी समन्वयाने निर्णय घेत जिल्ह्यात नवे समीकरण उदयास आणले.
आता स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये स्पर्धा लागली आहे. महापालिकेची तिजोरी राखण्याचा मान आपल्याला मिळावा यासाठी लाॅबिंग सुरू झाले आहे. आता सभापती पदाची लाॅटरी नेमकी कोणाला लागणार? हे 24 एप्रिल रोजी स्पष्ट होणार आहे. परभणी शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह विशेष समित्यांच्या सभापती व प्रभाग समिती सभापती निवडीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे.
स्थायी समिती सभापतीपदासाठी सत्ताधारी शिवसेना (Shivsena) व काँग्रेसच्या इच्छुक नगरसेवकांनी लॉबिंग सुरु केले आहे. एकूण 11 पैकी शिवसेना व काँग्रेसच्या वाट्याला किती समित्यांचे सभापती पदे येणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपला एका समितीचे सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे. परभणी शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती, विशेष सात समित्यांसह तीनही प्रभाग समिती सभापती निवडीचा कार्यक्रम आयुक्त नितीन नार्वेकर, नगरसचिव विकास रत्नपारखे यांनी जाहीर केला आहे.
यामध्ये स्थायी समिती सभापती, गलिच्छ वस्ती निर्मुलन घरबांधणी व समाज कल्याण समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती, स्थापत्य समिती सभापती, वैद्यकीय व सहाय्य आरोग्य समिती सभापती, विधी समिती व महसुल वाढ समिती सभापती, शहर सुधार समिती सभापती व माध्यमिक, पूर्व माध्यमिक व तांत्रीक समिती सभापतींसह प्रभाग अ, ब व क समितीच्या सभापतींची निवड केली जाणार आहे.
कुणाच्या वाट्याला किती सभापतीपदे?
महानगरपालिकेवर शिवसेना व काँग्रेस (Congress) आघाडीची सत्ता आहे. महापौर हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे तर उपमहापौर हे काँग्रेस पक्षाचे आहे. तर प्रत्येक विशेष समितीत आघाडीचे संख्याबळ अधिक असल्यामुळे सभापतीपदासाठी याच पक्षाच्या नगरसेवकांची वर्णी लागणार हे निश्चित आहे. महापालिकेत महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समितीसह महिला व बाल कल्याण समितीचे सभापतीपद ठाकरेंचा पक्ष सोडण्याची शक्यता नाही. त्यामुळे उर्वरीत सहा समित्यातील काँग्रेसला कोणत्या समित्या दिल्या जातात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. स्थायी समितीसाठी शिवसेनेमध्येच इच्छुकांची संख्या मोठी आहे. तर काँग्रेसमध्ये मोठी स्पर्धा पहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.