Nana Patole, Uddhav Thackeray, Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

MVA News : मविआत पटोले-राऊत वादाचा भडका; पवारांचा दिल्लीत फोन, तर ठाकरेंचीही आली पहिली प्रतिक्रिया

Political News : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, अंतिम टप्प्यातील या जागावाटपावरुन पक्षांमध्ये कुरबुरी आणि ओढाताण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Sachin Waghmare

MVA News : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांतील घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चेवेळी वादाची ठिणगी पडली आहे.

बैठकीत शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाद झाल्याचे पुढे आले आहे. त्यानंतर आघाडीतील पटोले-राऊत वादानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहिली प्रतिक्रया दिली. त्यानंतर या वादात मध्यस्थी करीत शरद पवारांनी दिल्लीतील हायकमांडशी चर्चा केली असल्याचे समजते. (MVA News)

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, अंतिम टप्प्यातील या जागावाटपावरुन पक्षांमध्ये कुरबुरी आणि ओढाताण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील काँग्रेसचे (Congress) नेतृत्व हे जागावाटपाच्या चर्चेसाठी सक्षम नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यानंतर, नाना पटोले यांनीही थेट पत्रकार परिषदेतूनच पलटवार केला. त्यामुळे, नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील वाद रंगला आहे.

या बैठकीत झालेल्या वादानंतर शिवसेना (Shivsena) उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एका वाक्यातच ह्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. मी याबाबत माहिती घेईन आणि तुमच्याशी बोलेन, असे एका वाक्यात ठाकरेंनी उत्तर दिले. त्यासोबतच, जागावाटपावेळी खेचाखेची होत असते, पण ती तुटेपर्यंत तानायचं नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे.

जास्त पक्ष असल्यावर ओढाताण होत असते प्रत्येक पक्षाला जागा हवी असते. मात्र, ओढाताण होत असताना ती ओढाताण एवढी होऊ नये की ती तुटेल याचे भान सर्व नेत्यांना असायला हवे, असेही ठाकरेंनी यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. उद्या किंवा दोन ते तीन दिवसांत महाविकास आघाडीतील जागावाटप होईल, असेही त्यांनी सांगितले.

शरद पवारांची काँग्रेस हायकमांडशी चर्चा

आघाडीतील या जागा वाटपावरुन काँग्रेस व शिवसेनेत सुरू असलेल्या वादानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केल्याचे समजते. महाविकास आघाडीत वाद विकोपाला जात असताना आता शरद पवारांनी मध्यस्थी केली असून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला आणि के. सी. वेणुगोपाल यांच्याशी शरद पवार यांनी चर्चा केल्याची सुत्रांची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT