Santosh Deshmukh Murder Case  Sarkarnama
महाराष्ट्र

Nana Patole : ...फक्त, सत्ता वाचवण्यासाठी महायुतीची धडपड ; नाना पटोले यांची बीड हत्याकांडावरून सरकारवर आगपाखड

Santosh Deshmukh murder Case : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली. यानंतर राज्यात एकच असंतोष उसळला आहे. यावरू महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

Aslam Shanedivan

Pune News : राज्यातील बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण सध्या चांगलेच तापलं आहे. सत्ताधारी आमदारांसह विरोधक यावरून सरकारला घेरतं आहेत. पण महायुतीचे सरकार चौकशी सुरू असून कोणाला सोडणार नाही असेच म्हणत आहे. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर पत्रकार परिषद घेत जोरदार टीकास्त्र सोडले आहे. यावेळी पटोले यांनी निवडणूक आयोग, बदलापूर फेक एन्काऊंटर, पीक विमा घोटाळा आणि पालकमंत्रीनियुक्त्यांवरून देखील निशाना साधला आहे.

पटोले यांनी, निवडणूक आयोगाच्या सध्याच्या कारभारामुळे आयोगाच्या विश्वासार्हततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे म्हटले आहे. तर भाजप व निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकल्याचा दावा त्यांनी केली आहे. तसेच पटोले यांनी, निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असतानाही आयोगाने लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप केलाय. तर 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर आंदोलन करुन जनजागृती करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

तसेच पटोले यांनी, विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचे सांगत, लोकसभेनंतर फक्त सहा महिन्यात 50 लाख मतदार कसे वाढले? असा सवाल केला आहे. तर मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 नंतर रात्रीच्या अंधारात 76 लाख मतदान कसे वाढले? याचे पुरावे द्या, अशी मागणी केली आहे. पण मागणी करूनही आयोग आकडेवारी देत नाही. तर आता माहिती न देण्यासाठीच कायदाच केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर हा कायदा निवडणूक आयोग व भाजपाने मतदारांच्या मतदानावर टाकलेला दरोडा लपवण्याचा प्रकार असल्याचेही पटोले म्हणाले.

बदलापूर फेक एन्काऊंटर ?

बदलापूरच्या एका शाळेतील लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी अक्षय शिंदेचे फेक एन्काऊंटर केले. हे आम्ही त्याचवेळी सांगितले होते. आज त्यावर शिक्कामोर्तब झाला असून उच्च न्यायालयाने संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाईचे आदेश दिले आहेत. या पोलीसांवर कारवाई झालीच पाहिजे पण या एन्काऊंटरचे आदेश मंत्रालय व पोलीस महासंचालक कार्यालयातून कोणी दिले त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

बदलापूर प्रमाणेच परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. पोलीसांनी कोंबिग ऑपरेशनवेळी सोमनाथ सुर्यवंशीला अटक केली. त्याला कोठडीत मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत खोटी माहिती दिली. सुर्यवंशी याचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे फडणवीस यांच्याविरोधात हक्कभंग आणणार असल्याचेही पटोले यांनी म्हटले आहे.

दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निघृणपणे हत्या का झाली याचे कारण सर्वांसमोर आहे. बीड जिल्ह्यात खून, खंडणी, अपहरण, भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे. बीडमधील माफियाराज सत्तेतील एका मंत्र्याच्या आशिर्वादानेच सुरु असून याची पोलखोल आता सत्ताधारी पक्षातील एक आमदार जाहिरपणे करत आहे. सरकारला याची सर्व माहिती असून फक्त सत्तेची खूर्ची वाचवण्यासाठी महायुतीचा प्रयत्न सुरू असल्याचेही पटोले यांनी म्हटले आहे.

पालकमंत्रीपदाचा वाद मलईसाठी

राज्यात सत्तेवर आलेल्या महायुतीत सुरुवातीपासूनच वाद आहेत. सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपदावरून वाद होता. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपावरुन वादावादी आणि आता पालकमंत्रीपदासाठी वाद सुरु आहेत. मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर गेले पण त्यांना तेथून नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकंमत्रीपदाला स्थगिती द्यावी लागली. पालकमंत्र्याबरोबर सहपालकमंत्री पद हे दोघे मिळून खाऊ यासाठी तयार केले आहे असा टोला पटोले यांनी लगावला आहे.

टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार

तसेच बीड जिल्ह्यातील पीक विमा घोटाळा उघड झाला असून पडीक जमिनीचा विमा काढून ३५० कोटी रुपयांची लूट केली आहे. या घोटाळ्यात पीकविमा कंपन्या व सरकारचा सहभाग आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही पण विमा कंपन्यांना भरपूर फायदा सरकारने दिला. तिजोरीतील पैशावर शेतकऱ्यांच्या नावाने दरोडा टाकला असून पीक विमा घोटाळा म्हणजे शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याचेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT