Neelam Gorhe Sarkarnama
महाराष्ट्र

Neelam Gorhe: तीन वर्षांत दोनदा वाचल्या नीलम गोऱ्हे... दोन्हीवेळी मदतीला धावून आले प्रवीण दरेकर

Neelam Gorhe : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वासदर्शक ठराव फेटाळल्यानंतर त्यांच्यावर विश्वासदर्शक ठराव संमत करण्यात आला.

Hrishikesh Nalagune

Mumbai : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वासदर्शक ठराव फेटाळल्यानंतर त्यांच्यावर विश्वासदर्शक ठराव संमत करण्यात आला. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी हा ठराव मांडला आणि आवाजी मतदानाने तो संमत देखील झाला. अचानक आलेल्या या विश्वासदर्शक ठरावावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला.

त्याचवेळी दुसऱ्या बाजूला ज्या प्रवीण दरेकर यांनी गोऱ्हेंना उपसभापती पदावरून हटवण्यासाठी 4 वर्षांपूर्वी तयारी केली होती, त्याच दरेकरांवर मागच्या 3 वर्षांमध्ये गोऱ्हे यांच्या बाजूने दोनवेळा विश्वासदर्शक ठराव मांडण्याची वेळ आली आहे. हा एक अनोखा राजकीय योगायोग म्हणायला हवा.

2021 च्या हिवाळी अधिवेशनात अकोला महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावरील लक्षवेधीवर बोलू न दिल्याने प्रवीण दरेकर यांनी गोऱ्हेंविरोधात अविश्वास ठराव आणला होता. गोऱ्हे पक्षपातीपणा करत आहेत, त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे, असे म्हणत हा ठराव मांडण्यात आला होता. त्यावेळी त्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात होत्या.

त्यानंतर गोऱ्हेंनी शिवसेनेत प्रवेश करत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. या पक्षप्रवेशानंतर जर कुणी आमच्यावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून सोबत येत असेल तर त्यांच्यावर आम्ही अविश्वास कसा दाखवू? असं म्हणत भाजपने हा अविश्वास ठराव मागे घेतला. त्यानंतर दरेकर यांनीच गोऱ्हे यांच्याबद्दलचा विश्वासदर्शक ठराव आणला आणि सभागृहात मान्यही झाला.

आताही दिल्लीमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी गोऱ्हे यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले होते. निवडणुकीच्या तिकिटासाठी ठाकरेंना मर्सिडीज द्यावी लागत होती, या गोऱ्हे यांच्या विधानाने खळबळ उडाली होती.

गोऱ्हे यांच्या या विधानावर संतापलेल्या महाविकास आघाडीकडून 4 मार्च रोजी अविश्वास प्रस्ताव विधिमंडळ सचिवांकडे सादर केला होता. या प्रस्तावावर दहापेक्षा अधिक सदस्यांच्या सह्याही होत्या. गोऱ्हे यांनी सभागृहाचा विश्वास गमावल्याने त्यांना उपसभापतीपदावरून हटवावे अशी मागणी या प्रस्तावाद्वारे केली होती.

पण सभापती शिंदे यांनी विधिमंडळाचे अधिनियम, कायदेशीर बाबींवर बोट ठेवले. ठराव 14 दिवसांपूर्वी सादर करणे अपेक्षित असते. त्यामुळे हा ठराव अधिनियमाच्या कक्षेत बसत नाही, असे सांगून त्यांनी तो तांत्रिक मुद्द्याच्या आधारे फेटाळला. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी सभापतींवर संताप व्यक्त केला.

यानंतर बुधवारी विधान परिषदेत नियमित कामकाज सुरु असताना अचानक भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनीच नीलम गोऱ्हे यांच्यावर ही विधान परिषद पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे, अशा आशयाचा एका ओळीचा विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव सभापती राम शिंदे यांनी मतदानास टाकला व सभागृहाने आवाजी मतदानाने मंजूर केला.

यावर विरोधकांनी जोरदार गोंधळास सुरुवात केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी जोरदार विरोध केला. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सभापतींचा निर्णय अंतिम असतो, असे विरोधकांना बजावले. विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज दोनदा स्थगित करावे लागले. पण गेल्या दोन वर्षांत प्रवीण दरेकर यांनी गोऱ्हेंविरोधात दोनदा विश्वासदर्शक ठराव मांडला हेही तितकेच खरे!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT