Dharashiv News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. विशेषतः सहा खासदारांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. त्यातच उद्धव ठाकरे हे पक्ष सोडून गेलेल्या या सहा खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेत असल्याने वातावरण तापले आहे. त्यातच धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी त्यांना मिळणाऱ्या केंद्रीय मंत्रिपदाबाबत मोठे विधान केले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याना ज्यावेळी अडचणी आल्या, त्यावेळी नेहमीच मी त्यांच्यासोबत राहिलो आहे. आठ महिन्यापूर्वी पाऊस झाला त्यावेळी मी दहा ते १५ दिवस पूरपरिस्थितीत नागरिकांसोबतच होतो. त्याशिवाय जिल्ह्यातील डीपीसाठी ३० कोटी रुपयांची मागणी असताना केवळ एक कोटी रुपये देण्यात आले होते. त्यामुळे डीपी कुठे बसावयाचे हा माझ्यासमोर प्रश्न उभा टाकला होता. विरोधात राहिल्याने प्रश्न सुटत नसल्याचे २० वर्षाच्या कारकिर्दीत लक्षात आले होते, असेही ते म्हणाले.
केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याने खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडल्याची टीका केली जात आहे. त्यावर एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ओम राजेनिंबाळकर म्हणाले, 'काही जणांनी आम्ही सत्तेत असताना आमच्यावर शून्य काम आहे अशी टीका केली. पण माझ्या मतदारसंघातील लोकं ही माझ्याविषयी जाणून आहेत. मी कशासाठी सत्तेत गेलो आहे. त्यामुळे येत्या काळात मला मंत्रिपद दिले तरी मी घेणार नाही. हे प्रामाणिकपणे नम्रपणे नकार देईन. येत्या तीन वर्षात मी मंत्रिपद घेणार नाही, घेणार नाही. मी मंत्री होण्यासाठी चाललो नाही. माझा उद्देश वेगळा आहे.'
धाराशिवचा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत तिसरा नंबर आहे. या जिल्ह्यावरचा मागासलेला शिक्का काढून घेणे ही माझी पहिली जबाबदारी आहे. एमआयडीसीसाठी जमिनी आहेत मात्र त्यावरील उद्योग शून्य आहेत. कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प आहे. त्याला राष्ट्रीय मान्यता घ्यायची आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून निधी घ्यायचा आहे. कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी आले तर रान रिकामे राहणार नाही. शेतकऱ्यांना त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबुन रहावे लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील बॅरेजेस करून घ्यायची आहेत. पॉवर ट्रान्सफर व सबस्टेशनच्या कामासाठी निधी आणून कामे करायची आहेत. ही सगळे कामे करणे व लोकांशी प्रामाणीक राहणे हे देखील माझे कर्तव्य आहे. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला. त्यासोबतच गेली २० वर्ष संविधानाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे झगडलो. त्यामुळे सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हे लक्षात आले. त्यामुळे येत्या काळात लोकांसाठी जी कामे शक्य आहेत ते प्रामाणिकपणे करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कृष्णनीतीचा अवलंब करणार
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आजही आदरच आहे, उद्या ही राहणार आहे. त्यांच्या बाबतीत मी कधीच बोलणार नाही. फक्त विरोधातील मंडळी सत्तेचा वापर करून आम्हाला अडचणीत आणत होती. त्यामुळे आता आम्ही देखील सत्तेसोबत राहून त्यांच्याविरोधात कृष्णनीतीचा अवलंब करणार असल्याचे ओम राजेनिंबाळकर यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.