Dharashiv news : धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय दोन दिवसापूर्वीच घेतला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर त्यांच्या मतदारसंघातच उलटसुलट चर्चा रंगली आहे. त्यांच्या घोषणेनंतर मतदारसंघातील वातावरण आता चांगलेच तापले आहे. गेल्या दहा वर्षांपासून एकत्र राजकारण करणारे या निर्णयामुळे दोन भाऊ आता वेगवेगळ्या राजकीय वाटांवर उभे ठाकल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच त्यांचे चुलत बंधू मकरंद राजेनिंबाळकर यांनी ओम राजेनिंबाळकर यांच्या पक्षांतराच्या निर्णयाला विरोध केला आहे. पक्षाचा आदेश मिळाला तर खासदार राजेनिंबाळकर यांच्या विरोधात रस्त्यावर उतरायलाही तयार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या शिवसेनेतील प्रवेशाबाबत मोठे गौप्यस्फोट केले जात असतानाच काही घटनाक्रम समोर आले आहेत. गेल्या महिनाभरापासून त्यांचे बंडाचे प्लॅनिंग सुरू होते, पक्षांतराबाबत चर्चा झाली होती, मात्र तो निर्णय मला मान्य नव्हता, असा थेट दावा त्यांचे चुलत बंधू मकरंद राजेनिंबाळकर यांनी केला आहे. खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या पक्षांतराच्या निर्णयाला आता घरातूनच विरोध झाल्याचे चित्र आहे. स्वतःचे बंधू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांनी ओमराजेंच्या निर्णयापासून स्पष्टपणे फारकत घेत उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ओमराजेंच्या नव्या राजकीय वाटचालीला पहिला मोठा धक्का घरातूनच बसल्याची चर्चा रंगली आहे.
मकरंद राजेनिंबाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख आहेत. पक्षाचा आदेश मिळाला तर ओम राजेनिंबाळकरांच्या विरोधात रस्त्यावर उतरायलाही तयार असल्याचा इशारा मकरंद राजेंनी दिला आहे. ओमराजे यांनी पक्षांतराबाबत माझ्यासोबत चर्चा केली. मात्र मला निर्णय पटला नाही , त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. मी समजूनही सांगण्याचा प्रयत्न केला. 2029 ला ही आपण सहज निवडून येऊ, असे सांगितले, पण त्यांनी ऐकले नाही.
व्यवस्थेला जाब विचारून काम करून घेणे ही शिवसेनेकडून अपेक्षा असते, यापुढे काम तसं होईल. पक्षाने आदेश दिला आणि गरज पडली तर ओमराजेंच्या विरोधात रस्त्यावरही उतरण्याची तयारी असल्याचेही मकरंदराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २८ जूनला धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याची तयारी केली जात आहे. ओमराजेंनी पक्ष सोडला तरी शिवसैनिकांची गर्दी आणि ताकद कायम ठाकरेंसोबतच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. धाराशिवच्या राजकारणात आता लढाई भावाविरुद्ध भाऊ अशी पहायला मिळणार आहे. त्यासोबतच येत्या काळात संघटनात्मक बांधणीवर भर देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.
कट्टर राजकीय विरोधक पाटील कुटुंबाकडून ओमराजेंचे महायुतीत स्वागत केले आहे. युतीने उमेदवारी दिल्यास प्रचारही करू, असे सांगत जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटीलांकडून खासदार ओमराजे निंबाळकर यांचे स्वागत करण्यात आले. आता विकासासाठी ते महायुतीत आले असतील तर त्यांना आमचे सहकार्यच असेल. अर्चना पाटलांनी २०२४ मध्ये ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.