Dharashiv MP Omraje Nimbalkar  Sarkarnama
महाराष्ट्र

Om RajeNimbalkar News: राजकीय खेळ संपण्याची भीती, पवनराजे प्रकरणातही मदतीची आशा : ओम राजेनिंबाळकरांच्या पलटीमागचं 'खरं' कारण

Om RajeNimbalkar Shiv Sena Entry News: खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे धाराशिवच्या राजकारणात नवा संघर्ष सुरू झाला आहे. पवनराजे हत्या प्रकरण, राणा पाटील यांच्याशी संघर्ष आणि आगामी राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे.

दयानंद माने

Operation Tiger News: महाराष्ट्र निर्मितीच्या वेळचे विरोधी पक्षनेते, पक्षनिष्ठा, विचार, पुरोगामी व सालस राजकारणाबाबत ज्यांचे नाव सातत्याने सांगितले जाते अशा उद्धवरावदादा पाटील यांचा धाराशिव जिल्हा सध्या खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या राजकीय पक्षांतराने चर्चेत आहे. शिवसेनेतील २०२२च्या मोठ्या फुटीनंतर नुकतीच सहा खासदारांच्या बंडाने आणखी एक फूट शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षात झाली आहे. या सहा खासदारांत सर्वात लक्षवेधक चर्चा राजेनिंबाळकर यांच्या भोवती राहिली आहे.

धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणावर प्रदीर्घ काळ सत्तेवर राहिलेल्या पद्मसिंह पाटील यांच्या राजकारणाला आक्रमकपणे वेसण घालणारा नेता अशी प्रतिमा निंबाळकर यांनी निर्माण केली आहे. शिवाय त्यांच्या या संघर्षाचे खरे कारण त्यांचे वडील पवन राजेनिंबाळकर यांची हत्या व या प्रकरणात कथित सहभाग असलेले डॉ पद्मसिंह पाटील यांचे नाव. आता मुंबईच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणात डॉ पाटील व इतर सर्व आरोपींची पुराव्याअभावी मुक्तता केली असली तरी पुढील राजकारणात व न्यायालयीन प्रक्रियेतही हा वाद पुन्हा गाजण्याची शक्यता आहे. कारण सीबीआय उच्च न्यायालयात जाणार आहे.

ओमराजेंची लोकप्रियता घटली...

सहा खासदार फुटण्याच्या बातम्या माध्यमांत पसरत असताना व त्यातील चार खासदार दिल्लीला पोहोचले असताना ओमराजे मात्र सर्वात शेवटी व रात्रीतून विशेष विमानाने दिल्लीला पोहोचले व मगच या ऑपरेशन टायगरची पूर्तता झाली. त्यानंतरही ओमराजे यांनी आपण पवनराजे हत्या प्रकरणाचा निकाल २० तारखेला लागल्यावर आपला राजकीय निर्णय घेऊ, कारण माझ्या दृष्टीने हा अतिशय भावनिक व महत्वाचा विषय असल्याचे सांगत होते. मात्र हा निकाल त्यांच्या विरोधात गेला. मात्र निकालाचा कोणताही परिणाम न होता ओमराजे यांनी आपल्या शिंदे गटातील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या या निर्णयावरुन त्यांचे सोशल मिडिया वर प्रचंड ट्रोलिंग करण्यात आले. सोशल मिडियात असंख्य फालोअर्स असलेल्या ओमराजेंची लोकप्रियता घटली.

तिकडे ओमराजेंचे जिल्ह्यातील कट्टर विरोधक भाजपचे आमदार व डॉ पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणाजगजितसिंह पाटील यांची प्रतिक्रियाही साहजिकपणे समोर आली. न्यायदेवतेने तब्बल १७ वर्षांनंतर न्याय दिला, असे ते म्हणाले. तर ओमराजे म्हणाले की आमच्यावर अन्याय झाला. हा या दोन घराण्यांतील संघर्ष असला तरी पवनराजे यांची हत्याप्रकरण या दोघांच्या राजकारणाचा प्रमुख संघर्ष बिंदू आहे.

राणा पाटील-ओमराजे संघर्ष पेटणार

आता ओमराजे सत्ताधारी असलेल्या शिंदेंच्या सोबत म्हणजे भाजपसोबत महायुतीत आले आहेत. आणि तिथे त्यांचे कट्टर विरोधक व भाजपचे आमदार राणा पाटील आहेत. या दोन प्रमुख विरोधी नेत्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर मांडीला मांडी लावून बसावे लागणार आहे. या मांडीला मांडी लावून बसण्याच्या मुद्द्यावर ओमराजे यांनी मांडीला मांडी नव्हे तर त्यांच्या ऊरावर बसणार आहे, अशी प्रतिक्रिया समर्थकांच्या बैठकीत व्यक्त केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा नव्याने राणा पाटील व ओमराजे यांच्यात संघर्ष पेटणार असल्याचे दिसते.

भावी राजकारणाची दिशा

शिवाय पवनराजे प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओमराजे यांच्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत आपण याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करून योग्य ते सहकार्य करणार असल्याचे वचन ओमराजे यांना दिले आहे.

याशिवाय ओमराजे यांनी पक्ष सोडताना माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात तीन आमदार ठाकरे गटाचे निवडून आलेले असताना व स्वतः साडेतीन लाख मतांनी लोकसभेला निवडून आलो असताना एकही स्थानिक स्वराज्य संस्थांत आमच्या पक्षाला यश का मिळाले नाही, असा रोकडा सवाल पत्रकारांमार्फत आपल्याच पक्षनेत्यांना अर्थात ठाकरे पितापुत्रांना केला होता. हा मुद्दाही भावी राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.

थोडक्यात आपले राजकीय अस्तित्व व शक्य असल्यास पवनराजे हत्या प्रकरणातील पुढील न्यायालयीन लढाईत यश मिळावे या उद्देशाने हा प्रवेश केल्याची शक्यता आहे. ओमराजे यांनी ही राजकीय पलटी मारली असली तरी त्यांच्या राजकीय व कौटुंबिक लढाईत ते कमजोर पडत असल्याने त्यांनी शिंदे गटाचा आधार घेतल्याचा अन्वयार्थ आता तरी काढता येतो.

आगामी राजकारणाची नांदी...

देश, राज्य व स्थानिक धाराशिवचे राजकारण असा गुंता या राजकीय घटनेने निर्माण झाला आहे. देशाच्या राजकारणात साम दाम दंड भेद निती वापरून भाजप अधिक भक्कम व विरोधकांना अधिक कमजोर करत निघाला आहे. तर राज्यात महायुती अंतर्गतच भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था व इतर अनेक महापालिकांच्या निवडणुकांत तो संघर्ष दिसून आला. धाराशिव जिल्ह्यातही ओमराजे व राणा पाटील यांच्या निमित्ताने तो तीव्र होईल, अशी शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT