Parbhani News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका गेल्या पाच वर्षानंतर प्रथमच झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात विधानपरिषदेच्या जवळपास 17 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यातून निवडून द्यावयाच्या आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. या ठिकाणच्या निवडणुकीला आता लवकरच मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. त्यातच आता परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मोठी चुरस पाहवयास मिळणार आहे.
यावेळेस महायुती व महाविकास आघाडीमध्ये सरळ लढत होत असली तरी संख्याबळ पाहता महायुतीचे पारडे जड असणार आहे. गेल्या निवडणुकीत या ठिकाणी एकसंध शिवसेनेकडून रिंगणात उतरलेल्या गोपीकिशन बाजोरिया यांना संधी देण्यात आली होती. त्यांनी या निवडणुकीत बाजी मारली होती. मात्र, या निवडणुकीत शिंदे सेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे मेगाप्लॅन तयार आहे.
परभणी जिल्ह्यातील नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामधील संख्याबळ पाहता महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अधिक आहे. त्या पाठोपाठ भाजप व एकनाथ शिंदेंचे संख्याबळ आहे. तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना, काँग्रेस व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असल्या तरी अद्याप या ठिकाणच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाने मर्यादा ओलंडल्याने पार पडलेल्या नाहीत. त्यामुळे त्याठिकाणच्या निवडणुका होण्याची निवडणूक आयोग वाट पाहणार की निवडणुकीची घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची (Shivsena) संख्या अधिक आहे तर त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व भाजप अशी क्रमवारी आहे.
या मतदार संघात जून 2018 मध्ये निवडणूक पार पडली होती. यावेळी ऐनवेळी त्याठिकाणची जागा युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आली होती. या ठिकाणी शिवसेनेने ऐनवेळी अकोल्यातील विप्लव बाजोरिया यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी संख्याबळाचा विचार केला तर काँग्रेससाठी ही निआवडणूक सोपी होती. याठिकाणी सुरेश देशमुख हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असताना या ठिकाणी इतर ठिकाणहून आलेल्या सेनेच्या बाजोरियाने विजय मिळवला होता. त्यामुळे आता संख्याबळाचा विचार करता महायुतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी व भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच दिसणार आहे.
दोन्ही जिल्ह्यातील संख्याबळ पाहता या ठिकाणी अजित पवार यांच्या पक्षाच्या वाट्याला जागा येऊ शकते. मात्र, दुसऱ्या नंबरवर असलेल्या भाजपला देखील संधी आहे. भाजपकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने कोणाला संधी दिली जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. परभणी विधानसभा निवडणुकीवेळी शिंदे सेना ज्यापद्धतीने आक्रमक झाली होती. त्याप्रमाणे हटाला पेटून उमेदवारी मिळवण्याची शक्यता अधिक आहे. महायुतीमध्ये दोन पक्ष एकत्रित आल्यास तिसऱ्या पक्षाच्या बंडाचा फारसा परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीतून कोणता पक्ष निवडणूक लढणार याची उत्सुकता लागली आहे.
गेल्या निवडणुकीत आर्थिक बळावर शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांनी निवडणुकीत बाजी मारली होती. त्यामुळे या निवडणुकीत एकादा आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी ऐनवेळी घोडाबाजार पाहावयास मिळणार आहे. याठिकाणी लक्ष्मीपुत्रांना निवडणुकीत उत्तरण्याची संधी असून उलाढाल कितीपटीने वाढणार याची उत्सुकता वाढली आहे.
परभणी जिल्ह्यातील संख्याबळ
परभणी जिल्ह्यातील संख्याबळ पाहता महायुतीमधील अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 90, भाजप 80, एकनाथ शिंदे शिवसेना 26, तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना 38, काँग्रेस 46, यशवंत सेना 27, जनसुराज्य 13, अपक्ष 6, रासप 5, इतर 6 असे एकूण 335 सदस्य आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील संख्याबळ
हिंगोली जिल्ह्यात महायुतीमधील एकनाथ शिंदे शिवसेना 51, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 41, भाजप 19, काँग्रेस 13, उद्धव ठाकरे यांची शिवसेना 5, वंचीत 1 असे एकूण 130 सदस्य आहेत.
आकडेवारी बदलण्याची शक्यता
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, औंढा, पालमसारख्या ठिकाणी निवडणुका खूप आधी झाल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी काहींनी कोलांटी उड्या मारल्या आहेत. तर काही जण मृत आहेत. त्यामुळे याचा या आकडेवारीवर थोडाबहुत परिणाम होणार आहे. तरीही या दोन्ही जिल्ह्याचा विचार करता यामध्ये महापालिकेच्या पाच स्वीकृत नगरसेवकांची व जिल्हा परिषदेच्या पाच स्वीकृत नगरसेवकांची अंतिम निवड बाकी आहे.
दोन्ही जिल्ह्यांत इच्छुकांची मांदियाळी
विधान परिषदेच्या या जागेसाठी दोन्ही जिल्ह्यांत इच्छुकांची कमी नाही. विशेष म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इच्छुकांची संख्या जास्त आहे. तरीही ही जागा कोणाला सुटणार? हा खरा प्रश्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.