A. Y. Patil
A. Y. Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

kolhapur Politics : ए. वाय. पाटलांचे कार्यकर्ते आक्रमक; ‘बिद्री कारखाना अथवा आमदारकी, वरिष्ठांकडून शब्द घ्या’

Vijaykumar Dudhale

राहुल गडकर

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील खेडोपाड्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस टिकवून ठेवणारे, आमदार होण्याची पात्रता असूनही अंतर्गत कुरघोडीमुळे आमदार होऊ न शकलेले पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची आता कार्यकर्त्यांनीच कोंडी करायला सुरुवात केली आहे. पाटील यांची अंतर्गत गटबाजीमुळे होत असलेली घुसमट आता कार्यकर्त्यांनाच सहन होईनाशी झाली आहे. त्यामुळेच ए. वाय. पाटील यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव वाढला आहे. वरिष्ठांसोबत लवकरच बैठक घ्या अन् बिद्री कारखाना अथवा आमदारकी हा शब्द घ्या, असा दबाव कार्यकर्त्यांकडूनच आणला जात आहे. या दबावापुढे ए. वाय. मात्र हतबल झाल्याचे दिसून येत आहे. (A. Y. Patil's activists aggressive; 'Bidri factory or MLA, take word from senior NCP Leaders')

राष्ट्रवादी काँग्रेस राधानगरी विधानसभा मतदारसंघात बळकट करण्यामागे ए. वाय. पाटील यांचे सक्रिय योगदान आहे. याच मतदारसंघात राष्ट्रवादीत माजी आमदार के. पी. पाटील हेदेखील आहेत. विधानसभा निवडणूक आणि बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत ए. वाय. पाटील यांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीने राधानगरीत दोन वेळा आमदारकी आणि बिद्री साखर कारखान्यावर सत्ता स्थापन केली आहे. माजी आमदार के. पी. यांची सध्या बिद्री कारखान्यावर सत्ता आहे.

पक्षाशी एकनिष्ठ राहूनही ए. वाय. पाटील यांच्या पदरात आतापर्यंत एसटी महामंडळाचे अध्यक्षपद एवढेच सत्तेचे पद टाकले आहे. ए. वाय. यांच्या कार्यकर्त्यांना सहकारी संस्थांचे अध्यक्षपद देऊन पाठीमागे ठेवण्याचे काम राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले आहे, असा आरोप पाटील गटाकडून होत आहे. आता मात्र ए. वाय. पाटील गट आक्रमक झाला आहे. ‘आत्ता नाही तर कधीच नाही’ अशी भूमिकेत कार्यकर्ते आहेत.

आगामी निवडणुकीत 'विधानसभा अथवा बिद्री साखर कारखान्याचे चेअरमनपद' असा शब्द राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून घ्यावा, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून ए. वाय. यांच्याकडे केला जात आहे. कार्यकर्त्यांच्या दबावामुळे ए. वाय. पाटील यांच्यापुढेही पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी काळात ती कोणती भूमिका घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

राष्ट्रवादी फुटीनंतरही ए. वाय. यांची कोंडी कायम

राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्यात अंतर्गत संघर्ष आहे. तो अनेकदा चव्हाट्यावर आलेला आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनाही या दोघांमधील वाद सोडविण्यात यश आलेले नाही. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर ए. वाय. पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. माजी आमदार के. पी. पाटील यांनी काही दिवस ‘वेट आणि वॉच’ची भूमिका घेत तीन महिन्यांनंतर अजित पवार गटात प्रवेश केला.

माजी आमदार के. पी. पाटील यांनी अजितदादांच्या गोटात प्रवेश केल्यानंतर ए. वाय. पाटील हे नाराज झाल्याची चर्चा आहे. एकीकडे शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत जाणे, दुसरीकडे प्रतिस्पर्धी शिंदे गट आणि अजित पवार गटात येणे आणि त्यामुळे होणारी कोंडी हे ए. वाय. पाटील यांच्या ध्यानात आली आहे. कार्यकर्तेही ते जाणून आहेत, त्यामुळेच कार्यकर्त्यांनी आता पाटील यांच्यावर दबाव वाढवला आहे.

मुश्रीफांनी रोखला ए. वाय. पाटलांचा भाजप प्रवेश

राष्ट्रवादीत फूट पडण्यापूर्वी ए. वाय. पाटील हे भाजपमध्ये जाण्याची चर्चा रंगली होती. त्यासंदर्भात सोळांकुर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार होते. पण, तत्पूर्वीच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी करून ए. वाय. पाटील यांना राष्ट्रवादी सोडण्यापासून रोखले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT