Solapur, 26 May : माजी उपमुख्यमंत्री आणि चार आजी-माजी आमदार, एका खासदाराच्या उपस्थितीत मोहिते पाटील यांच्या माळशिरसची तालुक्याची तब्बल 15 वर्षांनंतर आमसभा झाली. या आमसभेत उपस्थितांकडून प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. अधिकाऱ्यांना काही प्रश्नांची उत्तरे देता आली तर काहींची देता आली नाहीत, त्यामुळे आमदारांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. आमदार उत्तम जानकर यांनी मात्र आगामी काळात प्रत्येक सहा महिन्याला आमसभा घेण्याचा शब्द दिला. त्यावेळी मागील आमसभेत किती प्रश्न मार्गी लागले याचा आढावा घेणार असल्याचे स्पष्ट केले.
माळशिरसच्या आमसभेला (Malshiras Aamsabha) माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार अभिजीत पाटील, माजी आमदार रामहरी रूपनवर, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि विविध विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार उत्तम जानकर होते. माळशिरस तालुक्याच्या आमसभेवर माजी आमदार राम सातपुते गटाने बहिष्कार टाकला होता.
आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी तालुक्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेऊन त्यावर उपाय योजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. माळशिरस येथे शंभर खाटांचे ट्रामा सेंटर उभारण्यात येणार आहे. संजय गांधी निराधार आणि अपंग योजनेतील लाभार्थींना अनुदान मिळावे, यासाठी त्यांची केवायसीसह इतर कागदपत्रांची पूर्तता त्यांच्या घरापर्यंत जाऊन ३० जूनपर्यंत करावी, अशी सूचना आमदारांनी केली.
प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दर सहा महिन्याला आता माळशिरसची आमसभा घेणार आहे. प्रत्येक आमसभेत मागील आमसभेतील किती प्रश्न मार्गी लागले आहेत, याचा आढावा घेतला जाईल. तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयाबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्या त्या कार्यालयात आठवड्यात एकदा बैठक घेणार असून तक्रारदारांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आव्हान आमदार जानकर यांनी केले आहे
केळीच्या अनुदानाविषयी आमदार अभिजीत पाटील कृषी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले असता त्या अधिकाऱ्यांना कुठलीही माहिती सांगता आली नाही. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे अनुदान मिळते, त्या अपघातांची माहिती पुढील ३० तारखेपर्यंत घेऊन या, अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
दारूमुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पण पोलिस आणि उत्पादन शुल्क विभाग त्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे, या दोन्ही विभागांनी एकत्रितपणे कारवाई करून दारुबंदी करावी. दारू सुरू राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही अभिजीत पाटील यांनी दिला.
माळशिरस तालुक्यातील 36 ग्रामपंचायतीना शेती महामंडळाची गावठाणासाठी जमीन मिळावी, असा प्रस्ताव दाखल केला असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे. हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. माळशिरसची आमसभा 2010 नंतर होत असल्याने या आमसभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.