Solapur, 29 May : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. बावनकुळे यांच्या या दौऱ्यात माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी या तीन वरिष्ठ आमदारांची गैरहजेरी दिसून आली. प्रदेशाध्यक्षांचा नियोजित दौरा असूनही पक्षाच्या तीन वरिष्ठ आमदारांनी मारलेली दांडी ही बावनकुळे यांच्या दौऱ्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
बावनकुळेंनी निरोप देऊन गेल्याचे सांगून वेळ मारून नेली असली तरी बाजार समितीच्या निवडणुकीपासून दोन देशमुखांची असलेली नाराजी अद्याप कायम आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनीही (Chandrashekhar Bawankule) दौऱ्यात नमूद असलेली कोअर कमिटीची बैठक न घेताच निघून जाणे पसंत केले, त्यामुळे बावनकुळेंच्या दौऱ्याची शहरात विशेष चर्चा सुरू आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सोलापूरचा (Solapur) दौरा पूर्वनियोजित होता, तरीही पक्षाचे सर्व आमदार त्यांच्या दौऱ्यावेळी उपस्थित नव्हते. बावनकुळे यांच्या दौऱ्यावेळी सकाळी आमदार देवेंद्र कोठे, आमदार समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक, जिल्हा आणि शहराध्यक्ष आवर्जून उपस्थित होते. मात्र, दोन्ही देशमुख आणि कल्याणशेट्टी यांची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवली.
आमदार विजयकुमार देशमुख हे हैद्राबादला गेले असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले, तर आमदार सचिन कल्याणशेट्टी हे केरळच्या दौऱ्यावर असल्याची माहिती आहे. आमदार सुभाष देशमुख हे सोलापूर शहरात असूनही ते कोणत्याही कार्यक्रमाला नाहीत, त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नित्तउणुकीपासून पक्षात पडलेली फूट आणि मतभेद कायम असल्याची दर्शविणारी आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांंनी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत गैरहजर असलेल्या आमदारांबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. काहीजण मला सांगून गेले आहेत, काहींचे पूर्वनियोजित दौरे आहेत. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. मात्र, सकाळीच एक आमदाराच्या घरी जाऊन आलो आहे, जाताना एका आमदाराला भेटणार आहे, असे सांगून आमदारांच्या गैरहजेरीची चर्चा होणार नाही, याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला.
शासकीय बैठक, पत्रकार परिषद संपवून बावनकुळे हे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेणार होते. मात्र, भाजपच्या बैठकीला ते अर्धा तास उशीरा आले. आल्यानंतर त्यांनी आपण कोणतेही भाषण करणार नाही, फक्त निवेदन स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने मार्गदर्शनाची आस लावून बसलेल्या कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली.
आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे सकाळी नाश्ता केलेले बावनकुळे यांनी दुपारी रंजिता चाकोते यांनी आणलेल्या आमरस पुरीवर ताव मारला. त्यानंतर विमातळाकडे जाता जाता माजी सहकार मंत्री सुभाष देशमुखांच्या घरी भेट दिली. त्याठिकाणी ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी यांनी त्यांचे स्वागत केले. देशमुखांची भेट घेऊन बावनकुळे हे विमानतळाकडे रवाना झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.