कऱ्हाड तालुक्यातील १२ जिल्हा परिषद गटांपैकी पाच गट खुले, तर चार गट महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक इच्छुक मातब्बरांना उमेदवारीसाठी “मै नहीं तो पत्नी सही” अशी वेळ आली आहे.
पाल, उंब्रज, मसूर, तांबवे, येळगाव हे गट खुले राहिल्याने इच्छुकांना दिलासा मिळाला असून, कोपर्ड हवेली, वारुंजी, कार्वे, रेठरे बुद्रुक या गटांत महिला उमेदवारांना संधी मिळणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी राखीव असल्याने विंग व काले गटातील महिला उमेदवार या पदाच्या प्रमुख दावेदार ठरणार आहेत, तर पंचायत समिती सभापतिपदासाठीही महिलांमध्ये मोठी चुरस अपेक्षित आहे.
Karad, 13 October : सातारा जिल्हा परिषदेच्या कऱ्हाड तालुक्यातील १२ गटांपैकी पाल, उंब्रज, मसुर, तांबवे, येळगाव हे पाच गट खुले झाल्याने तेथील बड्या इच्छूक मातब्बरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, कोपर्ड हवेली, वारुंजी, कार्वे, रेठरे बुद्रुक या चार गटांत महिला आरक्षण आल्याने ‘मै नही; तो पत्नी सही’ अशा भूमिकेत इच्छूक असल्याची स्थिती आहे.
कऱ्हाड दक्षिणमधील (Karad South) राजकीयदृष्ट्या महत्वाचे असलेल्या काले, सैदापूर, विंग गटातील खुल्या प्रवर्गातील मातब्बरांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता दुधाची तहान ताकावर भागवण्याची वेळ येणार आहे. तालुक्यातील सात गण खुल्या प्रवर्गासाठी तर वाघेरी, वारुंजी, सुपने, विंग, कार्वे, रेठरे बुद्रुक, शेरे, कालवडे, येळगाव हे ११ गण सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहेत. एकुण २४ पैकी १२ गण हे महिलांसाठी राखीव झाले आहेत.
कऱ्हाड पंचायत समितीच्या आरक्षणासाठी कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात आज (ता. १३ ऑक्टोबर) आरक्षण सोडत काढण्यात आली. उंब्रज गटही खुला असल्याने तेथेही इच्छुकांची संख्या वाढणार असून भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) तेथे टक्कर होईल. त्याअंतर्गत असलेले उंब्रज गणात नागरिकांचा मागास प्रवर्गाची महिला, तर तळबीड गण सर्वसाधारणसाठी खुला झाला आहे. तळबीड गणातही अनेकांनी फिल्डींग लावली आहे.
पाल गणही खुला, तर चरेगाव गण नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे पाल गणासाठी इच्छुकांची संख्या वाढणार आहे. मसूर गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला आहे. त्यामुळे पंचायत समितीसाठीही अनेकजण इच्छुक असणार आहेत. वडोली भिकेश्वर गणात सर्वसाधारण महिला राखीव असल्याने तेथे मात्र महिलेचा नवीन चेहरा शोधावा लागणार आहे.
कोपर्डे हवेली गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, सह्याद्री कारखान्याचे संचालक नेताजी चव्हाण, भाजपमध्ये प्रवेश केलेले शैलेश चव्हाण यांच्यासह अन्य काही इच्छुकांनी तयारी केली होती. मात्र, तो गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने तेथे आता महिलेला संधी मिळणार आहे. मात्र कोपर्डे हवेली गण हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्याने तेथे संबंधित इच्छुकांना संधी मिळू शकते. त्याचबरोबर वाघेरी गणातही सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेचा नवीन चेहरा शोधावा लागणार आहे.
सैदापुर गटात पुन्हा एकदा भाजपकडुन सागर शिवदास यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सैदापुर, हजारमाची गणही अनुसुचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे तेथील खुल्या प्रवर्गातील इच्छुकांचा स्वप्नांवर पाणी फिरल्याचे स्पष्ट झाले. वारुंजी जिल्हा परिषद गट हा अनेक वर्षांनंतर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे तेथून इच्छुक असलेले कॉंग्रेसचे कऱ्हाड दक्षिण तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, उद्योजक प्रमोद पाटील, नरेंद्र नांगरे-पाटील यांच्यासह अन्य इच्छुकांवर ‘मै नही तौ सौ सही’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
कोयना वसाहत गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने तेथे इच्छुकांना उभे राहण्याची संधी आहे. वारूंजी गण अनुसुचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने तेथेही नवीन चेहऱ्याला संधी द्यावी लागणार आहे. तांबवे गण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्या गणातुन उत्तम राऊत व अन्य इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण असल्याने तेथे सुपने गणातील इच्छुकांच्या सौं ना यावेळी संधी द्यावी लागणार आहे.
विंग गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांच्यासह इच्छुकांच्या पत्नींना तेथे संधी मिळू शकते. कोळे गण मात्र सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला असल्याने तेथे माजी उपसभापती रमेश देशमुख, राजेंद्र चव्हाण यांच्यासह अन्य इच्छुकांना संधी मिळू शकते. कार्वे गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे तेथे आता कोणाला संधी मिळणार, याची उत्कुसता असणार असुन कार्वे गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेला तर गोळेश्वर गणात नागरिकांचा मागास प्रवर्गातील नव्या उमेदवारांना संधी मिळु शकते.
रेठरे बुद्रुक गटही सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्या शामबाला घोडके यांना संधी चालून आली आहे. मात्र सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुकांना आता खुल्या झालेल्या गणाचाच आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे तेथे उमेदवारी कोणाला मिळणार यावही विजयाची गणिते अवलंबुन असणार आहेत. शेरे गणात मात्र महिलेला संधी मिळणार आहे.
कालवडे गणातुनही सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेला संधी मिळणार आहे. येळगाव गणात सर्वसाधारण महिलेला संधी मिळणार आहे. येळगाव गटातुन जर उमेदवारी नाही मिळाल तर सवादे गणातुन मात्र सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुकांना चांगली संधी चालुन आली आहे.
उदयसिंह उंडाळकर, देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळेंना पुन्हा संधी
ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे प्रतिनिधीत्व करत असलेला येळगाव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला आहे. पाल जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्याने तेथे जिल्हा परिषदेचे माजी अर्थ सभापती देवराज पाटील, मसूर गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्याने माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, तांबवे जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधीत्व केलेले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील या मातब्बरांसह उंब्रजकरांनाही पुन्हा संधी चालून आली आहे.
विंग, कालेतील महिला उमेदवार झेडपी अध्यक्षपदाच्या दावेदार
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. तालुक्यातील विंग, काले हे गटही ओबीसी महिलेसाठी राखीव आहेत. हे दोन्ही गट कऱ्हाड दक्षिणमध्ये येत असून त्या गटावर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांचा उमेदवारीसाठी दावा असणार आहे. त्यामुळे त्या गटातून निवडून येणारी महिला ही जिल्हा परिषद अध्यपदासाठी दावेदार असणार आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार, याचीही उत्सुकता असणार आहे.
काले, सैदापुर, विंग गटातील नेते अडचणीत
राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या काले, सैदापुर आणि विंग गटातील आरक्षण हे बदलले आहे. त्यामुळे तेथील नेते अडचणीत आले आहेत. कालेतुन इच्छुक असणारे कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, अजित देसाई, नानासाहेब पाटील यांच्यासह अन्य इच्छुकांना फटका बसला आहे. सैदापुर गटातुन तयारी केलेल्या खुल्या प्रवर्गातील अनेक इच्छुकांचा मात्र भ्रमनिरासच झाला आहे. त्याचबरोबर विंग गट हा नागरीकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकराव खबाले, भागवत कणसे यांच्यासह अन्य इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले आहे.
अकरा गणातील महिला सभापतिपदाच्या दावेदार
कऱ्हाड पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे तालुक्यातील वडोली भिकेश्वर, कोपर्ड हवेली, वाघेरी, वारुंजी, सुपने, विंग, कार्वे, रेठरे बुद्रुक, शेरे, कालवडे, येळगाव हे ११ गण सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे संबंधित प्रभागातून निवडून येणारी महिला ही पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी दावेदार असणार आहे. त्यामुळे तेथील उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होणार असल्याचे स्पष्ट आहे.
प्रश्न 1 : कऱ्हाड तालुक्यात किती जिल्हा परिषद गट खुले राहिले आहेत?
पाच गट — पाल, उंब्रज, मसूर, तांबवे आणि येळगाव खुले राहिले आहेत.
प्रश्न 2 : जिल्हा परिषद अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे?
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) महिलांसाठी.
प्रश्न 3 : कोणत्या गटांमध्ये महिला उमेदवारांना संधी मिळणार आहे?
कोपर्ड हवेली, वारुंजी, कार्वे, रेठरे बुद्रुक आणि इतर काही गटांत महिलांसाठी आरक्षण आहे.
प्रश्न 4 : पंचायत समितीचे सभापतिपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे?
सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.