Manohar Joshi-Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ashadhi Wari : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पायी वारी करणार; जोशींनंंतर वारीत चालणारे दुसरे मुख्यमंत्री ठरणार

भारत नागणे

Pandharpur, 05 July : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रथमच आषाढी पालखी सोहळ्यामध्ये वाखरी ते पंढरपूर अशी पाच किलोमीटर पायी वारी करणार आहेत. युती सरकारमधील शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीही पायी वारी केली होती. पायी वारी करणारे ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले होते. जोशी यांच्यानंतर आता शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे पायी वारी करणारे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत.

दरम्यान, आषाढी यात्रा (Ashadhi Wari) कालावधीमध्ये चार दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून वारकऱ्यांना मोफत अन्नदान करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचा आरोग्य विभाग मंगेश चिवटे यांनी आज पंढरपुरात (Pandharpur) दिली.

राज्यात 1995मध्ये प्रथमच शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले होते. त्यात शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते, तर भाजपचे गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री बनले होते. त्याच वर्षीच्या आषाढी वारीत मुख्यमंत्री मनोहर जोशी सहभागी झाले होते. त्यांनी वाखरी ते पंढरपूर असा प्रवास पालखी सोहळ्यात पायी चालत केला होता.

मनोहर जोशीनंतर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यांच्या कालावधीत कोरोना असल्याने निर्बंध होते. ठाकरेंनंतरही एकनाथ शिंदे हे शिवसेनेचेच मुख्यमंत्री झाले आहेत. आता एकनाथ शिंदे हे आषाढी वारीत पायी चालणार आहेत. तेही वाखरी ते पंढरपूर असे चालत पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी यात्रेच्या पूर्वी पंढरपूरचा पाहणी दौरा करणार आहेत. ते वारीच्या तयारीची पाहणी करणार आहेत, असेही चिवटे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घातले आहे. त्यांच्या सूचनेनुसार आज पंढरपूर आणि पालखीतळाची पाहणी करून विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यातील एक विशेष पथक आषाढी यात्रेत काम करणार आहे. पंढरपूरमध्ये हे पथक लवकरच येणार असून आषाढी वारीनंतरही हे पथक काम करणार आहे, अशी माहितीही मंगेश चिवटे यांनी दिली.

दरम्यान, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा ओव्हाळ यांनी आज दर्शन बारी, वाखरी पालखीतळ, 65 एकर परिसराची पाहणी करून माहिती घेतली.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT