Solapur, 13 August : सोयाबीनला 5 हजार भाव दिला पाहिजे, यासाठी राज्याचे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाशा पटेल यांच्यासोबत पूर्वी यात्रा काढत होते. पण आजचा सोयाबीनचा भाव बघा काय आहे.
दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची माफी मागितली. पण, शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली, अशी टीकाही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यावर केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा सोलापूरमध्ये मुक्कामी होती. त्या वेळी माध्यमांशी बोलताना खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी सोयाबीन आणि कांदाच्या बाजारभावावरून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.
माढा लोकसभा मतदारसंघाबाबत आम्हाला 100 टक्के निवडून येण्याची खात्री होती. त्यानंतर शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचा एकत्रित फोटो पाहिला आणि आम्हाला खात्री झाली की सोलापूरची (Solapur) जागापण निवडून येईल, अशी आठवण खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या वेळी सांगितली.
ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी सरकार विरोधात नाराजी होती, त्यापेक्षा 10 पट नाराजी महाराष्ट्रातील खोके सरकार विरोधात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचेच सरकार सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
राखी पौर्णिमेला मला जेऊ घातले नाही, तर ओवाळणी परत घेईल, असे म्हणणारा भाऊ तुम्ही कधी पाहिला आहे का, असे सांगून कोल्हे म्हणाले, लाडकी बहीण योजनेवरून सत्तेतील आमदार अशी विधाने करत आहेत.
राज्याचे एक उपमुख्यमंत्री म्हणाले की, आमच्या नावापुढील बटन दाबले तरच योजना सुरू राहील. त्यामुळे बहिणींचा सन्मान करणे ही गोष्ट चांगली, पण फायद्यासाठी बहिणीचा सन्मान करणे हे पाप आहे, असा टोलाही त्यांनी अजित पवार यांना लगावला.
कोल्हे म्हणाले, उजनी धरणाचं पाणी कमी झाले की सोलापूरकरांचे काळीज कापते आणि भरले की आंनद होतो. उजनी धरणाच्या भूमिपूजन वेळी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पांडुरंगाची माफी मागितली आणि आता दोन पक्ष फोडून पुन्हा आलो हे ऐकतो. पंतप्रधान दोनवेळा सोलापूर जिल्ह्यात आले पण पांडुरंगाच्या दर्शनाला गेले नाहीत.
महाराष्ट्रात गंगा जमुनेसारखी भुसभूशीत माती नाही, तर सह्याद्रीसारखं राकट राज्य आहे. भाजपवाले गाईवर बोलतात पण रोजगारावर बोलत नाहीत, रामावर बोलतात पण कामावर बोलत नाहीत. हिडेंनबर्गचा अहवाल आलाय आणि सेबीच्या प्रमुख माधवी बूच यांच्यावर आरोप झालेत पण पंतप्रधान मोदी त्यावर बोलत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकार जाहिरातीवर 270 कोटी आणि योजना दूत योजनेवर 300 कोटी खर्च करत आहे. आमचा योजनेला विरोध नाही, तर योजनेच्या उद्देशाला विरोध आहे, असेही कोल्हे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.