Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP's Jansanman Rally : अजित पवारांनी बारामतीतून फुंकली विधानसभा प्रचाराची ‘तुतारी’!

Ajit Pawar Speech In Baramati : जनसन्मान रॅली विधानसभा निवडणुकीचे मतदान होईपर्यंत सुरू राहील, असे सांगून भरपावसात भाषण ठोकत अजित पवार यांनी बारामतीतून विधानसभा प्रचाराची ‘तुतारी’ फुंकली.

Vijaykumar Dudhale

Baramati, 14 July : जनसन्मान रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना बारामतीत आणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत शक्तिप्रदर्शन केले. अजितदादांनी आपल्या ३३ मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, विजबिल माफी, मोफत तीन सिलिंडर अशा घोषणांचा पुन्हा एकदा पाऊस पाडला. ही जनसन्मान रॅली विधानसभा निवडणुकीचे मतदान होईपर्यंत सुरू राहील, असे सांगून भरपावसात भाषण ठोकत अजित पवार यांनी बारामतीतून विधानसभा प्रचाराची ‘तुतारी’ फुंकली.

बारामती (Baramati) लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज बारामतीत जोरदार शक्तिप्रर्शन केले. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्व मातब्बर नेते तर होतेच. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान रॅलीला गर्दीही जोरदार होती. पावसातही लोकांनी अजित पवार यांच्या भाषणाला जोरदार प्रतिसाद दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांचा बारामतीत आपल्या ३३ मिनिटांच्या भाषणात पुन्हा एकदा पाऊस पडला. बहिण लाडकीपासून.... मोफत तीन सिलिंडर....शेतकऱ्यांचे विजबिल माफी अशा घोषणांचा पाऊस पाडला. आपण केलेला वादा कोणत्याही परिस्थिती पाळतो, हे सांगताना त्यांनी राजेश विटेकर यांच्या आमदारकीचे उदाहरण दिले.

परभणीतून राजेश विटेकर लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होता. मात्र, महादेव जानकर यांना तेथून उमेदवारी दिल्याने विटेकरला थांबावे लागले होते. पहिल्याच सभेत मी राजेशला शब्द दिला होता की, सहा महिन्याच्या आतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तुला आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. राजेश विटेकरला दिलेला शब्द आपण कालच्या निवडणुकीत खरा करून दाखवला, असे सांगून त्यांनी विधानसभेसाठी चलबिचल करणाऱ्या आमदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला.

माझ्या गरीब बहिणीला, मातेला मदत करायची होती. त्यानुसार अर्थसंकल्पात लाडकी बहिण योजना आणली. त्यातून महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही अर्ज करा, तो अर्ज मंजूर करायची काळजी आम्ही घेऊ. या योजनेसाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत अडीच कोटी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. दोन महिन्यांचे पैसे येत्या ऑगस्टमध्ये राखी पौर्णिला आपण तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या कुटुंबांचे उत्पन्न अडीच लाखांपर्यंत आहे, त्या सर्व महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे. बारामती तालुक्यात वर्षाला 180 कोटी रुपये या योजनेतून मिळणार आहेत. हौशी गौशे, नवसे येतील आणि काहीही सांगतील. पण हा अजितदादा शब्दाचा पक्का आहे. एकदा दिलेला शब्द पाळणारा आहे, असेही अजित पवार यांनी या वेळी भाषणातून सांगितले.

राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांचे 14 हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांची वीजबिल माफी केली. महिला, शेतकरी, गरीब, अशा सर्वांसाठी योजना आणल्या आहेत. आपण केलेल्या कामांवर बळीराजा खूष झाला आहे. त्यानेही आपल्या सभेला बरसून साथ दिली आहे. त्यामुळे सर्वांनी एकदिलाने कामाला लागावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

विभागानुसार महायुतीच्या सभा होणार आहेत. त्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी उपस्थित राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ही जनसन्मान रॅली विधानसभेचे मतदान होईपर्यंत थांबणार नाही. राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका ढवळून काढायचा आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT