Pandharpur, 14 July : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच महायुती विधानसभेची आगामी निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे पुन्हा सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. शिवाय पुढच्या वर्षी शिंदे यांच्या हस्तेच विठ्ठलाची शासकीय महापूजा होईल, असा दावा राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे आज (ता. 14 जुलै) पंढरपूरच्या (Pandharpur) दौऱ्यावर आले होते. त्या वेळी माध्यमांशी संवाद साधताना सत्तार यांनी हा दावा केला आहे. अब्दुल सत्तार यांच्या या दाव्यामुळे महायुतीमधून काय प्रतिक्रिया येतात, याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने (Shivsena) महायुतीत (Mahayuti) 90 ते 95 जागांची मागणी केली आहे, त्यापैकी 60 जागा या विजयी होऊ शकतात, असा दावाही पणन मंत्री सत्तार यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेचे वातावरण राहणार नाही. कारण, विधानसभा निवडणुकीत स्थानिक नेता कसा आहे. कार्यकर्ते कोण आहेत. नेत्याचा संपर्क आणि संबंध किती आहेत. जनतेला जिल्हाधिकारी कार्यालयापासून बीडीओपर्यंतच्या ज्या अडचणी येतात. त्या सोडविण्यासाठी मदत करणे, याबाबत मतदार मताच्या रुपाने तुलनात्मक अभ्यास करतो.
त्या नेत्याने कामे केली असतील तर त्याला मतदार विधानसभेचे तिकिट काढून मुंबईला पाठवतात. ज्यांनी कामं केली नाहीत, त्यांना ज्या मतदारसंघात निवडणूक लढवली, त्या मतदारसंघातच थांबावं लागतं, असंही सत्तार यांनी स्पष्ट केले.
सत्तार म्हणाले, लोकसभेचा कौल वेगळा असतो, तर विधानसभेला वेगळा कौल असतो, अशी परिस्थिती मी माझ्या 43 वर्षांच्या राजकीय आयुष्यात अनेकादा पाहिली आहे. विधानसभेच्या निवडणुकीला आणखी 90 दिवस बाकी आहेत. पंढरपूरच्या पांडुरंगाला मी एकच प्रार्थना करेन की, पुढच्या पाच वर्षांसाठीही एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होवोत.
माझ्या मनाला समाधान तेव्हाच होईल की आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री पुन्हा होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धत पाहता जे शेतकरी बांधव पंढरपूरला येत आहेत, त्यांच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील, असेही पणन मंत्र्यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.