Umesh Patil- Ajit Pawar-Yashwant mane-Rajan Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar Mohol Tour : अजितदादांच्या मोहोळ दौऱ्याला अखेर मुहूर्त; उमेश पाटील जनसन्मान यात्रेत राजन पाटलांसोबत एकत्र येणार का?

Vijaykumar Dudhale

Solapur, 21 September : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोहोळ येथील जनसन्मान यात्रेला अखेर मुहूर्त मिळाला असून ते उद्या रविवारी (ता. 22 सप्टेंबर) मोहोळ शहरात जनसन्मान यात्रेनिमित्त सभा घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त अनगर आणि मोहोळ शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मात्र, त्यापेक्षा जास्त उत्सुकता ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील हे आपल्या सर्वोच्च नेत्याच्या दौऱ्यात सहभागी होणार का? आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर एकत्र येणार का?, याची चर्चा मोहोळ मतदारसंघात रंगली आहे.

जन सन्मान यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा यापूर्वी 23 ऑगस्ट रोजी मोहोळ दौरा जाहीर झाला होता. मात्र, नाशिक येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जावे लागल्याने मोहोळमधील जनसन्मान यात्रेचा (Jan Sanman Yatra) कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुढे ढकलावा लागला होता. मात्र, तो कार्यक्रम उद्या होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या सकाळी हेलिकॉप्टरने अनगर येथे येणार आहेत. तेथून ते बिटले पाटी येथे पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्‌घाटन करणार आहेत. त्यानंतर अनगर कॉर्नर (यावली चौक) येथून मोहोळ शहरापर्यंत (Mohol) काढण्यात येणाऱ्या बाईक रॅलीमध्ये अजित पवार हे सहभागी होणार आहेत.

मोहोळ शहरात भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन केल्यानंतर अजित पवार हे जनसमान यात्रेच्या निमित्ताने लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. याचवेळी सभेचाही कार्यक्रम होणार आहे.

मोहोळमधील जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमानंतर माजी आमदार राजन पाटील यांच्या निवासस्थानी भोजनाचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान हा कार्यक्रम यापूर्वी म्हणजे 23 ऑगस्ट रोजीच होणार होता. मात्र, अजितदादांना मुख्यमंत्र्यांसोबत नाशिक येथील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जावे लागले होते, त्यामुळे मोहोळमधील जनसन्मान यात्रेचा 23 ऑगस्ट रोजीचा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. आता उद्या तोच कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान, अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अनगर अप्पर तहसील कार्यालयास कडाडून विरोध केला आहे. त्यावरून त्यांचे माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांच्याबरोबर आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

आमदार यशवंत माने यांनी ‘आगामी विधानसभा निवडणुकीत आपण उमेश पाटील यांना विधानसभेचा माझा प्रचार करा, असे सांगणारही नाही,’ असे स्पष्ट केले आहे, त्यालाही उमेश पाटलांनीही उत्तर दिले आहे.

दुसरीकडे, राजन पाटील यांच्यासोबत त्यांचा गेल्या काही वर्षांपासून उभा दावा आहे. त्या दोघांतून विस्तवही जात नाही, त्यामुळे आपल्या सर्वोच्च नेत्याच्या दौऱ्यात उमेश पाटील सहभागी होणार का? यशवंत माने आणि राजन पाटील यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर एकत्र येणार का? हा खरा प्रश्न आहे.

माढ्यातही होणार जनसन्मान यात्रा

मोहोळ येथील कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे माढ्यात जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम घेणार आहेत. माढ्यातील पुष्पक मंगल कार्यालयात अजित पवार हे लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला आमदार बबनराव शिंदे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

तत्पूर्वी अजित पवार हे अरण येथे जाऊन श्री संत सावता माळी महाराजांचे दर्शन घेणार आहेत. सायंकाळी करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन अजित पवार बारामतीकडे मार्गस्थ होणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT