Ajit Pawar-Suraj Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar : अजितदादांकडून शरद पवारांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना ‘नव्या इनिंग’साठी शुभेच्छा; घरी भेट दिल्याने चर्चेला उधाण!

NCP SP Youth District President Suraj Deshmukh : वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर सूरज देशमुख यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, अजितदादांनी राजकीय विचार बाजूला ठेवून सूरज देशमुख यांच्यासाररख्या नवउद्योजकांच्या पाठीशी राहण्याचा संदेश देत त्यांच्या घरी भेट दिली.

Vijaykumar Dudhale

Solapur, 25 April : उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी (ता. 24 एप्रिल) एका हॉस्पिटलच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. हॉस्पिटलच्या उद्‌घाटनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष सूरज देशमुख यांचे घर गाठले. सूरज देशमुखांचा नुकताच विवाह झाला असून अजितदादांनी पवारसाहेबांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना भेटून ‘नव्या इनिंग’साठी अर्थात वैवाहिक सहजीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख आणि डॉ. श्रेया पाटील यांचा विवाह सोहळा 20 एप्रिल रोजी टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे मोठ्या थाटामाटात झाला. देशमुखांच्या विवाह सोहळ्यासाठी राज्यभरातून मान्यवर मंडळी उपस्थित राहिली होती. या विवाह सोहळ्याची माढा आणि परिसरात चर्चा होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना काही कारणास्तव 20 एप्रिल रोजी विवाह सोहळ्यास उपस्थित राहता आले नव्हते. मात्र, एका हॉस्पिटलच्या उदघाटनाच्या निमित्ताने अजितदादा हे टेंभुर्णीच्या दौऱ्यावर आले होते. हास्पिटलच्या उद्‌घाटनंतर अजितदादांनी थेट पवारांच्या पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष सूरज देशमुख यांचे घर गाठले. देशमुख यांच्या घरी भेट देऊन नवदांपत्य सुरज देशमुख आणि डाॅ. श्रेया पाटील यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

वास्तविक, पाहता राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर सूरज देशमुख यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, अजितदादांनी राजकीय विचार बाजूला ठेवून सूरज देशमुख यांच्यासाररख्या नवउद्योजकांच्या पाठीशी राहण्याचा संदेश देत त्यांच्या घरी भेट दिली. मे. देशमुख आणि कंपनीच्या दर्जेदार रस्तेबांधणीमुळे अजितदादा-देशमुख घराण्याचे स्नेहाचे संबंध प्रस्थापित झाले आहेत, त्यातूनच अजितदादांनी देशमुख कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन नवदांपत्याला वैवाहिक सहजीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

देशमुख कुटुंबीयांतील महिलांनी औक्षण करून अजितदादांचे स्वागत केले. देशमुख कुटुंबातील व्यक्तींशी अजितदादांनी संवाद साधला आणि पवारांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या सूरज देशमुख यांना नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीवेळी राज्याचे युवक व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, माजी आमदार संजय शिंदे यांच्यासह देशमुख परिवारातील सदस्य उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT