Satara, 18 April : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच्या युतीतून 15 जागा जिंकून दमदार कामगिरी करणाऱ्या शिवसेनेने आता जिल्ह्यात आक्रमक पवित्रा घेतला आहे. संख्याबळ असूनही भाजपने ‘फिल्डिंग’ लावून शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम केला. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आता थेट भाजपच्या बालेकिल्ल्यात घुसून प्रत्युत्तर देण्याचे नियोजन केले आहे. येत्या 20 एप्रिलला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणारे कार्यक्रम हे केवळ विकास कामांचे सोहळे नसून, ते भाजपला शक्तिप्रदर्शनातून दिले जाणारे चॅलेंज मानले जात आहे.
सातारा जिल्हा परिषदेत (Satara Zilla parishad) शिवसेना (१५) आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे (२१) स्पष्ट बहुमत होते. मात्र, भाजपने अनपेक्षित खेळी करत शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या गटातील दोन सदस्य फोडले आणि थेट आमदार शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांनाच अध्यक्षपदी बसवले.
या घडामोडीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक राजू भोसले यांना झेडपीचे उपाध्यक्षपद मिळाले. या राजकीय गनिमी काव्यामुळे शंभूराज देसाईंचा (Shambhuraj Desai) सत्ता स्थापनेचा मनसुबा उधळला गेला. हा पराभव जिव्हारी लागल्यानेच आता शिवसेनेने साताऱ्यात ‘जशास तसे’ उत्तर देण्याची तयारी चालवली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २० एप्रिलला कोरेगाव मतदारसंघातील अंगापूर या तीर्थक्षेत्राला भेट देणार आहेत. या गावाला 2 कोटींचा निधी देऊन पालकमंत्री देसाई यांनी आमदार महेश शिंदे यांच्या मतदारसंघात नव्या पर्यायाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीनंतर शिंदे आणि देसाई यांच्यात अंतर पडत गेल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
कोरेगावातील कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सातारा शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गांधी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. ही सभा थेट बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना शह देण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे.
नवनिर्वाचित १५ सदस्यांचा सत्कार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा परिषदेतील ‘नैतिक विजय’ साजरा करणार आहेत. सातारा-जावळी या भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने शड्डू ठोकल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
संघर्षाची ठिणगी का पडली?
१) जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने पाटणमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांना कडवे आव्हान दिले. मंत्री, आमदारांना देसाईंच्या विरोधात उतरवत त्यांच्यावर अत्यंत कडवट भाषेत टीका करण्यात आली.
२) जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी भाजपने शिवसेनेच्या हक्काचे सदस्य फोडल्याचा राग पालकमंत्र्यांना आहे.
३) सातारा शहरात शिवसेनेची ताकद दाखवून बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना इशारा देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेने होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.