

Pandharpur, 18 April : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी दोन दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेल्या प्रतिगामी विचारसरणीच्या 20 महाराजांची यादी जाहीर केली होती. त्याचे तीव्र पडसाद पंढरपुरात उमटले. लवांडे यांनी महाराजांच्या पायावर नतमस्तक होऊन माफी मागितली पाहिजे. शरद पवार यांनीही माफी मागितली पाहिजे. माफी मागितली नाही तर सरकारने त्यांना अटक करावी; नाही तर संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वारकरी संप्रदायाने दिला.
वारकरी (Warkari) संप्रदायातील संघटना, संतांचे वंशज, सेवेधारी परंपरेचे प्रमुख यांच्या माध्यमातून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पंढरपुरातील कबीर मठात बैठक झाली. विकास लवांडे यांच्यासारख्या व्यक्तीला उत्तर द्यावं, अशी वारकारी संप्रदायाची धारणा नाही. कारण वारकरी संप्रदायाने उत्तर देणं म्हणजे खाली येण्यासारखं आहे. पण असा दुसरा विकास कोणी निर्माण होऊ नये, कुणीही उठावं आणि वारकऱ्यांवर, संतांवर आणि देवांवर बोलावं, अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ नये, यासाठी वारकरी संप्रदायाने ही भूमिका घेतली आहे, असे बैठकीनंतर महाराजांनी सांगितले.
रामकृष्ण वीर महाराज म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) यांनी जे लिखाण केले आहे, त्यानंतर विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील घुसखोर महाराज म्हणून मान्यवर महाराज मंडळींची नावे घोषित केली आहेत, त्याचा आम्ही या बैठकीत निषेध केला आहे. वारकरी संप्रदायातील पूजनीय मंडळींना हे घुसखोर म्हणत असतील तर त्यांच्या बुद्धीचे दिवाळं निघालेलं आहे, अशी भूमिका आम्ही व्यक्त केली आहे.
वारकरी संप्रदायावर अशा पद्धतीने कोणी चाल करून येत असेल तर त्याला धडा शिकविण्यासाठी राज्य सरकारने विकास लवांडे यांना तत्काळ अटक करावी. त्यांना अटक न झाल्यास आम्ही उद्या दुपारी आम्ही महाराज मंडळी पोलिस ठाण्यात जाऊन निवेदन देणार आहोत, असेही वीर महाराज यांनी म्हटले आहे.
राज्यातील वारकरी संप्रदाय संतप्त झालेला आहे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसं होऊ नये यासाठी विकास लवांडे यांना अटक करण्यात यावी. अटक न झाल्यास वारकरी संप्रदायातील सर्व मंडळी येत्या आठवड्यात पंढरपुरात तीव्र आंदोलन करतील, असा इशारा वीर महाराजांनी दिला.
वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे, मऊ मेणाहून आम्ही विष्णूदास त्या वारकरी संप्रदायाला कठीण व्रजाला भेदण्याची परीक्षा महाराष्ट्र सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाहू नये. लवांडे यांनी स्वतः येऊन महाराजांच्या पायावर नतमस्तक होऊन माफी मागितली पाहिजे. शरद पवार यांनीही माफी मागितली पाहिजे. नाही तर सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. हे न झाल्यास वारकरी संप्रदायाच्या रोषाला सर्वांना समोरे जावे लागेल, त्याची तयारी सर्वांनी ठेवावी, असेही वीर महाराज यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून विकास लवांडे यांना अटक करण्यात यावी. लवांडे यांना अटक झाली तरच वारकरी संप्रदायाला सरकार न्याय देत आहे, अशी आमची भूमिका राहील. सरकारवर आमचा विश्वास आहे.
विकास लवांडे यांनी जाहीर केलेले वारकरी संप्रदायातील प्रतिगामी विचारसरणी घुसखोर महाराज
१) गोविंद देवगिरी महाराज
२) चारूदत्त आफळे (पुणे)
३) बंडातात्या कराडकर
४) प्रकाश जवंजाळ (बुलडाणा)
५) तुषार भोसले (भाजप वारकरी आघाडीचे प्रमुख)
६) अक्षय भोसले (शिंदेसेनेच्या वारकरी आघाडीचे)
७) संग्राम भंडारे (संगमनेरमध्ये धिंगाणा घालणारे)
८) योगी निरंजन (आळंदी देवस्थाने विश्वस्त, आरएसएसचा कट्टर प्रचारक)
९) एकनाथ सदगीर (ठाणे परिसर)
१०) ज्ञानेश्वर जळकीकर
११) संजय पाचपोर
१२) भास्कर गिरी महाराज देवगड
१३) संजयनाना धोंडगे
१४) राणा वास्कर
१५) चंद्रशेखर देगलूरकर (पंढरपूर)
१६) उदबोध पैठणकर
१७) श्याम राठोड (सध्या नाव बदलून वागणारे)
१८) किशोर शिवणीकर
१९) रामगिरी महाराज
२०) निरंजन कोठीकर
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.