Madha, 08 May : मनोहर भोसले याच्यानंतर माढ्यातून आणखी एका भोंदूबाबाला टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली आहे. फसवणूक केल्याप्रकरणी माढ्याच्या आडेगाव येथील नाना महाराज ऊर्फ गुरु माऊली विरकर याला पोलिसांनी अटक केली आहे.
नाना महाराज विरकर याने माढा (Madha) तालुक्यातील आडेगाव येथे भोंदूगिरीचे आपले बस्तान बसविले होते. त्याच्याकडे मोठंमोठे राजकीय नेतेही येत असत. अनेक राजकीय नेत्यांचा त्याच्याकडे राबता होता, त्यामुळे जादूटोणा, भविष्य सांगणे आणि अशाच पद्धतीने लोकांची फसवणूक करण्याचे काम हा वीरकर महाराज करत होता.
पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील एका तरुणाला 2024 पासून व्यवसायात भरपूर पैसे मिळवून देतो. माझ्याकडील कासव घे, तुझ्यावर पैशाचा पाऊस पडतो, असे बोलून त्याने तरुणाचा फसवणूक केली होती. यातील पीडित तरुणाचा व्यवसाय तर वाढला नाहीच मात्र कर्जाचा डोंगर वाढत गेला.
तुम्हाला करणी बाधा आहे, त्यामुळे तुम्हाला कामाख्या देवीला काही विधी करावे लागतील, असे सांगून मला कामाख्या देवीला जायचं आहे, त्यासाठी विमान खर्च आहे, असे हा नाना महाराज वीरकर सांगत होता, त्या वेळी माझी ऐपत काही एवढी मोठी नाही. मी आधीच कर्जात आहे, असे सांगितले होते. पण प्रत्येक भेटीच्या वेळी मी त्याला मागणीप्रमाणे दहा, वीस हजार द्यायचो. हे सर्व पैसे मी त्याला रोख स्वरूपात दिले आहेत, असे त्या तरुणाने सांगितले.
संबंधित तरुणाने सांगितले की, मी पहिल्यांदा त्याला १७ फेब्रुवारी २०२४ रोजी भेटलो, त्या वेळी २० हजार रुपये ऑनलाईन दिलेले आहेत, तेवढं ट्रांझेक्शन माझ्याकडे आहे. तो कायम रोखीने पैसे घ्यायचा. आपली फसवणूक झाली आहे, हे लक्षात आल्यानंतर मी त्याला ‘माझे पैसे परत करा नाही, तर मी तुमच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे,’ असे सांगितले.
त्या वेळी त्याने ‘तू माझं काहीसुद्धा बिघडवू शकत नाही, पोलिस अधिकारी तेजस्विनी सातपुतेसुद्धा माझ्या भक्त आहेत. बरेच आमदार-खासदार माझ्या ओळखीचे आहेत, त्यामुळे तुला हळूहळू संपवून टाकीन, अशा धमक्या त्याने मला दिल्या होत्या. त्यामुळे मी तक्रार करायचं थांबलो होतो.
टेंभुर्णीचे यापूर्वीचे पोलिस निरीक्षक दीपक पाटील, नारायण पवार हे सुद्धा त्यांच्याकडे जायचे, त्यामुळे आम्ही एवढे दिवस थांबलो होतो. पण आता नवीन पोलिस निरीक्षक आल्यामुळे तक्रार दाखल केली आहे. मला न्यायाची अपेक्षा आहे, असे पीडित तरुणाने सांगितले.
आत्तापर्यंत जवळपास पाच लाखापेक्षा जास्त रुपयाची फसवणूक झाल्याचा दावा या तरुणाने केला आहे. आज पहाटे टेंभुर्णी येथे दोन लाख 35 हजार रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यावर वीरकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेंभुर्णी पोलिसांनी नाना वीरकर आणि त्याचा मोठा भाऊ विकास विरकर यांना आडेगाव येथील आश्रमातून ताब्यात घेतले आहे. या भोंदूबाबाने ज्यांची ज्यांची फसवणूक केली आहे, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.