

Solapur, 10 April : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील यशानंतर भारतीय जनता पक्षात संघटनात्मक मोर्चेबांधणीस सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाचे सोलापूर पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे मुंबईत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला आहे.
चेतनसिंह केदार-सावंत (Chetansingh Kedar Sawant) यांच्या जागी आता नव्या जिल्हाध्यक्षाची निवड केली जाणार आहे. त्यासाठी तिघेजण प्रबळ दावेदार आहेत. मात्र, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पसंती कोणाला मिळणार आणि पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे माढा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष असणार आहे.
भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत हे सोलापूर जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. पक्षाने त्यांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापतिपदी संधी दिली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीही सांगोला नगरपरिषदेवर निवडून आल्या आहेत. पती-पत्नी दोघांनाही भाजपकडून पदे मिळाली आहेत.
भारतीय जनता पक्षात साधारणपणे 'एक व्यक्ती, एक पद' हे तत्त्व पाळले जाते, त्यानुसार केदार सावंत यांची जिल्हा परिषदेच्या सभापतिपदी ज्या दिवशी निवड झाली, त्याच दिवशी त्यांचा जिल्हाध्यपदाचा राजीनामा घेण्याचे निश्चित झाले होते, त्यानुसार त्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे (करमाळा), प्रणव परिचारक (पंढरपूर) हे इच्छुक आहेत. परिचारक यांनी वरिष्ठ नेत्यांकडे तशी इच्छाही बोलून दाखवल्याची माहिती आहे. मात्र, पंढरपूर शहर व तालुका हा भाजपच्या सोलापूर पूर्व विभागात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पश्चिम विभाग अध्यक्षपदी त्यांना संधी दिली जाईल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे, त्यामुळे गणेश चिवटे हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
दरम्यान, गणेश चिवटे यांच्या पत्नी अश्विनी चिवटे ह्या वीट जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्याही सभापतिपदासाठी इच्छुक होत्या. परंतु त्यांना संधी मिळाली नाही. यापूर्वी त्यांनी भाजयूमोचे जिल्हाध्यक्ष पदाचीही जबाबदारी सांभाळली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.