Digvijay Bagal-Rashmi Bagal  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rashmi Bagal : ‘मकाई’वर स्वीकृत संचालकांची नियुक्ती...रश्मी बागलांच्या आमदारकीची मोर्चेबांधणी?

Makai Sugar Factory's Approved Director : करमाळा तालुक्यातील मोरवड येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी ‘रश्मी बागल यांना आमदार करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे,’ असे विधान केले आहे.

आण्णा काळे

Karmala, 18 June : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी आठ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थापनेपासून बागल गटाच्या ताब्यात असलेल्या ‘मकाई’च्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने स्वीकृत संचालक नेमण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही निवड रश्मी बागल यांच्या आमदारकीची मोर्चेबांधणी तर नाही ना, अशी चर्चा करमाळ्यात आता रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल (Rashmi Bagal), मकाई कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताच मागील 2019 ची विधानसभा निवडणूक झाल्यापासून अडचणीत असलेल्या बागल गटाचे राजकारण पुन्हा उभारी घेऊ लागल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करतात रश्मी बागल यांना महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे, त्यामुळे बागल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

भाजप आणि बागल यांच्यात प्रवेशावेळी कोणत्या कमिटमेंट झाल्या आहेत. याबाबत बागल यांनी कोणतीही वाच्यता केलेली नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रामाणिकपणे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम केले. निवडणूक कालावधीत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आमदार संजय शिंदे आणि रश्मी बागल यांची एकत्रित बैठक घडवून आणल्याची चर्चा आहे. या बैठकीत काय चर्चा झाली, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

एखाद्या सहकारी साखर कारखान्यात स्वीकृत संचालकपदी एकाच वेळी आठ जणांना संधी देण्याची ही महाराष्ट्रातील अपवादात्मक घटना असेल. मकाई कारखाना अडचणीत असताना आठ जणांची स्वीकृत संचालकपदी निवड करण्याचा नेमका हेतू काय असावा, हे उघडपणे सर्वसामान्यांच्या लक्षात येणारी गोष्ट आहे. ॲड. जयदीप देवकर (वरकटणे), गणेश तळेकर (वांगी), विलास काटे (खातगाव), महेश तळेकर(केम), अशोक पाटील(फिसरे), अनिल शिंदे(कोळगाव), राजेंद्र मोहोळकर (मोरवड), कल्याण सरडे (सांगवी) यांचा त्यात समावेश आहे.

करमाळा तालुक्यातील मोरवड येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी ‘रश्मी बागल यांना आमदार करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे,’ असे विधान केले आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून रश्मी बागल करमाळ्यातून उमेदवार असतील, या दिशेने बागल गटाची वाटचाल आणि तयारी सुरू असल्याचे स्पष्ट होते.

मकाई सहकारी साखर कारखाना हा स्थापनेपासून बागल गटाच्या ताब्यात आहे. गेल्या काही वर्षांपासून मकाई कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी रश्मी बागल, दिग्विजय बागल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतरही दोन महिने कारखान्याला मदत मिळू शकली नव्हती. लोकसभा मतदानाअगोदर चार-पाच दिवस कर्जाची रक्कम मिळाली आणि शेतकऱ्यांना गाळप उसाचे पैसे मिळाले. भाजपच्या मदतीने मकाई कारखाना जोमाने चालवण्यासाठी बागल गट प्रयत्नशील आहे.

कारखान्याचे उपाध्यक्षपद अजूनही रिकामेच

मागील वर्षी झालेल्या मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाला एकहाती सत्ता मिळाली. रश्मी बागल, दिग्विजय बागल विद्यमान संचालक मंडळात नाहीत. कारखान्याच्या स्थापनेनंतर प्रथमच बागल कुटुंबातील एकही सदस्य कारखान्याचा संचालक नाही. मकाईच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पांढरे यांची निवड होईल, अशी अपेक्षा असताना दिनेश भांडवलकर यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली आहे. कारखान्याचे उपाध्यक्षपद अजूनही रिकामेच आहे. उपाध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक होते. त्यातच आता आठ जणांची स्वीकृत संचालक म्हणून निवड झाली आहे.

कारखान्याच्या कारभारासाठी स्वीकृत संचालकांची नियुक्ती

आगामी हंगामाच्या दृष्टीने सध्या तयारी सुरू केली आहे. उस उत्पादकांचे मागील देणे दिले आहे. येत्या काही दिवसांत ऊस तोडणी वाहतूकदारांची देणी देण्यात येणार आहेत. पुढील हंगामाच्या दृष्टिकोनातून स्वीकृत संचालक निवडले आहेत. एकाच वेळी आठ जणांची निवड झाली असली तरी प्रत्येक विभागात वेगळा अनुभव असलेले सदस्य निवडले आहेत. सर्वांच्या अनुभवाचा फायदा कारखान्याची स्थिती सुधारण्यासाठी होईल, असे मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT