Rajendra Raut Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Barshi Bazar Samiti : राजेंद्र राऊतांचा सेना-राष्ट्रवादीला छोबीपछाड; भावाच्या हाती सत्ता देत बार्शी बाजार समिती एकहाती राखली

Vijaykumar Dudhale

Solapur, 30 August : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी भावाची, तर प्रशासकीय संचालकांमध्ये मर्जीतील कार्यकर्त्यांची वर्णी लावत भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. आमदार राऊत हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

बार्शी बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडूनही नावे पाठवली होती. मात्र, राऊतांनी महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड देत पुन्हा सत्ता राखताना भावाची मुख्य प्रशासक नेमत बाजार समिती एकहाती ठेवण्यात यश मिळविले आहे.

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Barshi Bazar Samiti) संचालक मंडळाची मुदतवाढ ही 23 जुलै 2024 रोजी संपली होती. त्यानंतर बाजार समितीवर प्रशासक म्हणून सहायक निबंधक उमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. पणन संचालकांच्या आदेशानंतर मुख्य प्रशासक, आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांचे बंधू विजय राऊत यांनी प्रशासक उमेश पवार यांच्याकडून बाजार समितीचा पदभार स्वीकारला.

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांची सत्ता होती. संचालक मंडळाची अंतिम मुदतवाढ संपल्यानंतर अशासकीय सदस्यांच्या प्रशासकीय मंडळाच्या (Non Governmental Board of Directors) नियुक्तीसाठी आमदार राऊत यांनी सात जणांची नावे पाठवली होती. ती सर्व नावे राऊत यांचे निकटवर्तीय होती.

राऊत यांनी आपल्या निकटवर्तीयांची नावे पाठवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांकडूनही अशासकीय प्रशासकीय मंडळासाठी धावपळ करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आणि शिवसेनेकडून प्रत्येकी दोन नावे पाठवण्यात आली होती. मात्र, आमदार राऊत यांनी आपले राजकीय वजन वापरत बाजार समितीची सत्ता पुन्हा एकदा एकहाती राखली आहे.

बार्शी बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळात संधी मिळालेले तिघेही राजेंद्र राऊतांचे निकटवर्ती आहेत. त्यामुळे बार्शी बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य इच्छुकांना डावलण्यात आल्याचे नव्या यादीतून स्पष्ट होते.

आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडून अशासकीय प्रशासक मंडळासाठी राऊतांचे बंधू विजय राऊत, शाहूराजे निंबाळकर, रोहित पाटील, युवराज बारबोले, ओंकार धायगुडे, ज्ञानेश्वर नाळे, अमोल चव्हाण यांची नावे पाठवली होती. हे सर्वजण भाजपचे विशेषतः राऊतांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

राऊत यांच्यानंतर राष्ट्रवादीकडून मुजमील पठाण, सुनील झाल्टे, तर शिवसेनेकडून आनंद यादव, भगवंत पाटील यांची नावे अशासकीय प्रशासकीय मंडळासाठी सरकारकडे दाखल करण्यात आले होती. राजेंद्र राऊत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला धोबीपछाड देत केवळ आपल्या समर्थकांची प्रशासकीय मंडळावर नियुक्ती करण्यात यश मिळविले आहे.

राजेंद्र राऊत यांचे बंधू विजय राऊत यांच्या हाती मुख्य प्रशासक म्हणून बार्शी बाजार समितीचे सूत्र देण्यात आली आहेत. त्यांच्या मदतीसाठी शाहूराजे निंबाळकर आणि ओंकार धायगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशासकीय प्रशासकीय मंडळाच्या निवडीचे पत्र मिळताच राऊत आणि इतर दोघांनी बार्शी बाजार समितीची सूत्रे स्वीकारली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT