Solapur, 26 May : माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ‘डॅमेज कंट्रोल’साठी खासदार प्रणिती शिंदे ह्या मैदानात उतरल्या आहेत. अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी शिंदे यांनी संवाद साधत त्यांना ‘तुमच्या अडचणी सांगा, अक्कलकोटचे पालकत्व स्वीकारून तुमच्यासाठी मी मैदानात उतरायला तयार आहे. मला तुमची साथ हवी आहे,’ असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी केले.
प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस भवनात बोलावलेल्या बैठकीला अक्कलकोटच्या माजी नगराध्यक्षा डॉ. सुवर्णा मलगोंडा, सातलिंग शटगार, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती भीमाशंकर जामदार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ॲड संजय गायकवाड, राजेंद्र गायकवाड, माजी सभापती अशोक देवकते यांच्यासह ग्रामीण भागातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आले होते. मात्र, विधानसभेसाठी तिकिट मागणारे मलिकार्जून पाटील हे मात्र बैठकीला अनुपस्थित असल्याचे दिसून आले.
अक्कलकोटमधून तीन वेळा निवडून आलेले आणि एकदा गृहराज्यमंत्रिपद भूषविलेले सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्कलकोट काँग्रेस म्हणजे सिद्धाराम म्हेत्रे असे आजपर्यंतचे समीकरण होते, त्यामुळे म्हेत्रे यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेताच पक्ष रिकामा झाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. कर्णधारानेच मैदान सोडल्यामुळे भांबवलेल्या सैनिकांना धीर देण्यासाठी आता प्रणिती शिंदे ह्याच मैदानात उतरल्या आहेत.
यापूर्वी अक्कलकोटबाबतचा निर्णय घेताना सिद्धाराम म्हेत्रे यांच्याशी चर्चा करावी लागत होती. मात्र, आता तो प्रश्न येणार नाही. तुमच्या कोणत्याही अडचणी असतील तर मला सांगा. मी अक्कलकोटचे पालकत्व स्वीकारून तुमच्यासाठी नेहमीच मैदानात उतरायला तयार आहे. तुम्ही एकटे नाही, मी तुमच्यासोबत कायम उभी राहीन, असा शब्दही खासदार प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांनी कार्यकर्त्यांना दिला.
खासदार शिंदे म्हणाल्या, कोणत्याही व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो. काही नेत्यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी, तसेच त्यांचे मनोबल वाढवून नवे नेतृत्व तयार करण्याची संधी या निमित्ताने तयार झाली आहे. अक्कलकोट तालुक्यात आजही काँग्रेस पक्ष मजबूत आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत कायम राहणार आहे, तुम्ही नव्याने कामाला लागावे.
सिद्धाराम म्हेत्रे यांनी पक्ष सोडल्यानंतर अनेकांचे ‘आम्ही काँग्रेससोबत आहोत,’ असे सांगणारे अनेक फोन आले. तालुक्यातील मतदार अजूनही काँग्रेस पक्षासोबत आहे, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बिलाबाबतचे प्रश्न मांडले, त्यावरही प्रणिती शिंदे यांनी ऊस बिलाच्या संदर्भात मी तुमच्यासोबत रस्त्यावर उतरायला तयार आहे, असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.