Sanjay Kokate-Abhijeet Patil-Babanrao Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur NCP : बबनदादा शिंदे अन्‌ अभिजित पाटलांना राष्ट्रवादीत घेतलं, तर आम्ही पक्षातून बाहेर पडू; राष्ट्रवादी नेत्याचा इशारा

भारत नागणे

Pandharpur, 13 August : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे हे पुन्हा शरद पवार गटात येण्यास इच्छुक आहेत. तसेच, पंढरपूरचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनाही पक्षात घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे नेते संजय कोकाटे यांनी विरोध दर्शविला आहे. शिंदे आणि पाटील यांना पक्षात घेतले तर आम्ही पक्षातून बाहेर पडू, असा इशाराच कोकाटे यांनी दिला आहे.

माढ्याचे आमदार बबन शिंदे (Baban Shinde) आणि त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांनी नुकतीच शरद पवार (Sharad Pawar) यांची पुण्यात जाऊन भेट घेतली. त्या भेटीनंतर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यानंतर संजय कोकाटे (Sanjay kokate) यांनी आज या दोघांच्या पक्ष प्रवेशाला विरोध दर्शविला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. ही यात्रा जिल्ह्यात असतानाच पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व पंढरपूरचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात घेण्यास विरोध केला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अभिजीत पाटील व माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधात काम केले होते. लोकसभा निवडणुकीनंतर आमदार बबन शिंदे आणि त्याचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे अलीकडेच शरद पवार यांना भेटले होते. त्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगली आहे.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी शरद पवारांची साथ सोडून भाजपला पाठिंबा दिला होता. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमदार बबन शिंदे व अभिजीत पाटील हे दोन्हीही नेते विधानसभेसाठी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहेत.

माढ्यातील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार बबन शिंदे व अभिजीत पाटील यांच्या पक्ष प्रवेशाला व उमेदवारीला तीव्र विरोध केला आहे. आमदार बबन शिंदे हे शरद पवार गटात येणार असतील तर आम्ही दुसऱ्या पक्षात असू असा इशारा संजय कोकाटे यांनी दिला आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT