Baliram Sathe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politic's : जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या बळीराम साठेंकडे नवी जबाबदारी

NCP SP District President बळीराम साठे यांना जिल्हाध्यक्षपदावरून हटविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. अगदी प्रदेश स्तरावरच्या नेत्यांकडूनही बळीराम साठे यांच्या जागी मर्जीतील नेत्याची नियुक्ती करण्यासाठी हालचाली झाल्या.

Vijaykumar Dudhale

Solapur, 14 June : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या बळीराम साठे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. साठे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना बढती देण्यात आली की त्यांचे डिमोशन करण्यात आले? अशी चर्चा सोलापूरच्या राजकारणात रंगली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे. विशेषत: पक्ष संघटनात्माक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे, त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सोलापूर (Solapur) जिल्ह्यात पक्ष संघटनेत भाकरी फिरवण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP SP) जिल्हाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशमुख यांच्या निवडीने तब्बल सहा वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नवा जिल्हाध्यक्ष मिळाला आहे. देशमुख हे मोहिते पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जाते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे (Baliram Sathe) यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता हे पद वरिष्ठ वाटत असले तरी जिल्हाध्यक्षांना जेवढे अधिकार असतात, तेवढे प्रदेश उपाध्यक्षांना असतात का? असा प्रश्न आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा 19 सप्टेंबर 2019 रोजी ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांनी तब्बल सहा वर्षे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे.

दरम्यानच्या कालावधीत बळीराम साठे यांना जिल्हाध्यक्षपदावरून हटविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. अगदी प्रदेश स्तरावरच्या नेत्यांकडूनही बळीराम साठे यांच्या जागी मर्जीतील नेत्याची नियुक्ती करण्यासाठी हालचाली झाल्या. मात्र, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भरभक्कम पाठिंब्यामुळे बळीराम साठे यांच्याकडील पद कायम राहिले होते.

मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर बळीराम साठे आणि मोहिते पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यातूनच बळीराम साठे यांची पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, बळीराम साठे यांनी आगामी निवडणुका न लढविण्याचा निर्णय मध्यंतरी अनौपचारिकपणे बोलताना जाहीर केला आहे, त्यामुळे ते जिल्हा परिषदेची आगामी निवडणूक लढवतील का नाही, याविषयी साशंकता आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतूनही त्यांनी माघार घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT