Pandharpur, 04 October : माढा विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात माढा मतदारसंघामध्ये बॅनरबाजी सुरू झाली आहे. हाच का 30 वर्षांचा विकास, असा प्रश्न उपस्थित करत त्यांच्या विकास कामांबद्दल अज्ञात लोकांनी अनेक ठिकाणी रात्रीतून डिजिटल बोर्ड लावले आहेत.
माढा शहरातील दुरवस्था झालेल्या इमारती, खराब असलेले रस्ते, पडका बनलेला निंबाळकरांचा किल्ला, रस्त्यावर पडलेले कचऱ्याचे ढीग अशा ठिकाणी ‘हाच का विकास’ असे बॅनर लावल्याने मतदार संघात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) यांच्या विरोधात बॅनर लागल्याने मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे. हे बॅनर कोणी लावले, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
माढा विधानसभा मतदारसंघ (Madha Assembly Constituency) सध्या राजकीय व्हाॅटस्पाॅट झाला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काॅंटे की टक्कर होणार आहे. महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या अधिक आहे, तर महायुतीमधून आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. ऐनवेळी आमदार बबनराव शिंदेंही हाती तुतारी घेतील, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, माढ्यातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनीही निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. तसेच, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वाधिक इच्छुक माढ्यातून दिसत आहेत. खुद्द बबनराव शिंदे यांच्याकडूनही तुतारीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
आमदार बबनराव शिंदे हे माढा मतदार संघाचे सलग तीस वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहेत, त्यामुळे आमदार शिंदे यांच्याविषयी काही प्रमाणात नाराजीचा सूर आहे. अशातच आता गावोगावी विरोधात बॅनर लागल्याने आमदार शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या बॅनरबाजीला आमदार बबनराव शिंदे गटाकडून हे कसे उत्तर दिले जाते, हे पाहणे महत्वाचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.