Solapur, 06 May : माढा लोकसभा मतदारसंघात दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना आपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे माढ्याबरोबरच पंढरपूरच्या राजकारणातही उलटफेर होताना दिसत आहेत.
लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) जाहीर झाल्यापासून 26 एप्रिलपर्यंत शरद पवार यांच्यासोबत असणारे अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली. कारवाईनंतर पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सोलापूरमध्ये भेट घेतली. त्या भेटीत तुम्ही आम्हाला मदत करा; आम्ही तुमच्या कारखान्याला मदत करू, असा शब्द दिला. त्यानंतर पुण्यातील ‘कर्ज वसुली लवादा’पुढे झालेल्या सुनावणीत अभिजित पाटील (Abhijeet Patil) यांना दिलासा मिळाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लवादाच्या निर्देशानुसार विठ्ठल कारखान्याच्या (Vitthal Sugar Factory) तीनही गोदामाचे सील काढून ती संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यात आली. विठ्ठल कारखान्यावरील कारवाई मागे घेतल्यानंतर अभिजीत पाटील यांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी रविवारी (05 मे) देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला. माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी प्रचार करणारे अभिजित पाटील यांनी अवघ्या आठच दिवसांत भूमिका बदलली.
अभिजित पाटील यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनीही आपला पाठिंबा धैर्यशील मोहिते पाटील यांना जाहीर केला आहे. त्यामुळे माढ्याबरोबरच पंढरपूरच्या राजकारणात मोठा उलटफेर होताना दिसत आहे. वास्तविक अभिजित पाटील भाजपकडे गेल्यामुळे भगीरथ भालके यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता होती.
अभिजित पाटील यांच्या निर्णयानंतर भगीरथ भालके यांनी आज (ता. 06 मे) तातडीने कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपला पाठिंबा माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना जाहीर केला आहे, त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांचे माढ्याच्या निवडणुकीत बळ वाढणार आहे.
बैठक घेऊन कार्यकर्त्यांना बूथबाबत माहिती दिली
मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्यासंदर्भात भगीरथ भालके म्हणाले की, आमचा पाठिंबा अगोदरपासूनच धैर्यशील मोहिते पाटील यांना होता. आज 57 गावांतील प्रमुख पदाधिकारी लोकांची बैठक बोलावली होती. आपल्यासोबत असणारे सर्वजण पहिल्यापासूनच तुतारीसोबत होते. बूथची यंत्रणा आणि काही लोक इकडं तिकडं झाल्यामुळे काही अडचण होऊ नये; म्हणून आज त्यासंदर्भात बैठक घेऊन सर्वांना माहिती दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.