Appasaheb Jagdale | Bharat Shah | Praveen Mane | Harshvardhan Patil | Dattatray Bharane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Indapur Assembly: आप्पासाहेब जगदाळे, भरत शहांच्या हाती इंदापूरच्या आमदारकीची चावी!

Maharashtra Assembly Election 2024: इंदापुरात गेल्या काही वर्षांपासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रेय भरणे यांच्यात दुरंगी सामना रंगलेला आहे. मात्र, राष्ट्रवादीतील फुटीमुळे राष्ट्रवादीतील दोन गटासमोर माजी मंत्री पाटील यांनी पवारांच्या राष्ट्रवादीत येऊन आव्हान दिले आहे. त्यामुळे टोकाचा संघर्ष असलेल्या इंदापुरात यंदा काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे डोळे असणार आहे.

Vijaykumar Dudhale

Indapur, 05 November : माघारीनंतर इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले असून यंदा तिरंगी सामना रंगणार आहे. भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आलेले माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या दुरंगी लढतीत प्रवीण मानेंच्या अपक्ष उमेदवारीने ट्विस्ट आणला आहे.

पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी पुन्हा एकदा भरणेंना पाठिंबा दिला आहे. मात्र, इंदापूर शहरातील बडे प्रस्थ भरत शहा यांनी आपली भूमिका अजून जाहीर केलेली नाही. जगदाळेंनी साथ सोडल्याने आणि शहा यांनी पाठिंब्याचा निर्णय अद्याप जाहीर न केल्याने माने एकटे पडले आहेत. मात्र, मागील काही निवडणुकीतील काट्याची टक्कर लक्षात घेता इंदापूरच्या आमदारकीची चावी जगदाळे आणि शहा जोडींच्या हातीच असणार आहे.

इंदापुरात गेल्या काही वर्षांपासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रेय भरणे यांच्यात दुरंगी सामना रंगलेला आहे. मात्र, राष्ट्रवादीतील फुटीमुळे राष्ट्रवादीतील दोन गटासमोर माजी मंत्री पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येऊन आव्हान दिले आहे. त्यामुळे टोकाचा संघर्ष असलेल्या इंदापुरात यंदा काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे डोळे असणार आहे.

महायुतीत इंदापूरची जागा आपल्याला सुटत नसल्याचे पाहून हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले. मात्र, त्यांना पक्षप्रवेश देऊन उमेदवारी जाहीर करताच लोकसभा निवडणुकीपासून भक्कम वाटणारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडले.

पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत प्रवीण माने, भरत शहा आणि आप्पासाहेब जगदाळे यांनी वेगळी चूल मांडून अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी घेण्यात आलेल्या मेळाव्यात सर्वांनी आणाभाका घेतल्या. मात्र, पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळेंनी अचानकपणे दत्तात्रेय भरणेंना (Dattatray Bharne) पाठिंबा जाहीर केला.

दुसरीकडे, इंदापूर शहरातील भरत शहा यांनी अजूनही माने यांच्या पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर केलेले नाही. दरम्यान, शहा यांनी माजी मंत्री पाटील यांना समर्थन द्यावे, यासाठी खुद्द शरद पवार यांनी मनधरणी केली आहे. मात्र, शहा हे अजूनही बधलेले दिसून येत आहे. पाटील आणि शहा कुटुंबातील वाद पाहता ते एवढ्या सहजासहजी पाटील यांना मदत करण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, शहरातून मताधिक्क्य मिळण्याबाबत शहा यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

मागील निवडणुकीत आप्पासाहेब जगदाळे हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत होते. या वेळी त्यांनी पुन्हा पलटी मारत भरणेंना समर्थन जाहीर केलेले आहे. जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाबाबत त्यांना यापूर्वी शब्द देण्यात आलेला होता. मात्र तो पाळण्यात न आल्याने जगदाळे नाराज होते. आता पुन्हा त्यांना कशाचे आश्वासन दिले, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

इंदापूरच्या राजकीय आखाड्यातील पाटील आणि भरणे ही लढत तुल्यबळ होती. आता त्यात प्रवीण माने यांच्या बंडखोरीने ट्विस्ट आणला आहे. मागील निवडणुकी माने हे भरणेंसोबत होते. मात्र मागील निवडणुकीतील समीकरणे आणि आताची समीकरणे बदलेली आहेत. त्याच इंदापुरात जरांगे फॅक्टर चालणार का, याकडेही लक्ष असणार आहे. काही असलेली तर तिरंगी लढतीत आप्पासाहेब जगदाळे आणि भरत शहा यांच्याच हातात इंदापूरच्या आमदारकीची चावी राहणार, हे मात्र स्पष्ट आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT