Solapur, 04 November : सोलापूर शहर मध्य मतदारसंघ शिवसेनेला न सोडल्याने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोलापुरातील शिलेदारांनी माघार घेत भाजप उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. सोलापूर शहर मध्य मतदारसंघ भाजपला सुटला नाही. मात्र, सोलापूर शिवसेनेने गनिमा कावा करत विधानसभेच्या निवडणुकीत महापालिकेच्या २५ जागा पदरात पाडून घेतल्या आहेत.
विधानसभेच्या जागा वाटपात महायुतीमध्ये भाजपकडून शिवसेनेला (Shivsena) सोलापूर शहर मध्य मतदारसंघ सोडण्यास नकार दिला होता. या मतदारसंघात भाजपने देवेंद्र कोठे यांना उमेदवारी जाहीर केली होती.
त्यामुळे संतापलेल्या शिंदेंच्या सोलापुरातील शिलेदारांनी पक्षाचा राजीनामा देत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज पक्षात रातोरात प्रवेश केला होता. त्याच पक्षाकडून सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी अर्ज भरला होता. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून मनीष काळजे यांनीही अर्ज भरला होता.
सोलापूर शहर उत्तरमधून अमोल शिंदे यांनी आणि सोलापूर (Solapur) शहर मध्य मतदारसंघातून मनीष काळजे यांनी निवडणुकीतून माघार घेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पाठींबा जाहीर केला आहे. तत्पूर्वी रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेने नेत्यांची चर्चा झाली होती. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या दोन्ही जिल्हाप्रमुखांनी माघार घेतली आहे.
सोलापूर शहर उत्तर मतदारसंघामधून अमोल शिंदे यांनी माघार घेतल्याने भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना, तर सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून मनीष काळजे यांनी माघार घेतल्यामुळे देवेंद्र कोठे यांना दिलासा मिळाला आहे. माघार घेण्यापूर्वी सोलापूरच्या शिवसेनेने भाजपकडून महापालिका निवडणुकीसंदर्भात शब्द घेतला आहे.
सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत नगरसेवकांच्या 25 जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्याबाबत चर्चा झाली आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघ शिवसेनेला सुटला नाही. मात्र, महापालिकेच्या आगामी निवडणुकीत २५ जागांची बेगामी मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोलापूरच्या शिलेदारांनी केले आहे.
सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप महायुतीचा प्रचार करणार असल्याचे अमोल शिंदे आणि मनीष काळजे यांनी जाहीर केले आहे. त्याचा फायदा महायुतीचे विशेषतः भाजपच्या उमेदवारांना होणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.