Karad, 29 May : विधानसभा, कृष्णा कारखाना, बाजार समिती या निवडणुकीत एकमेकांना कधी साथ तर कधी विरोध करत भोसले-उंडाळकर गटाची ५२ वर्षांपासूनची वाटचाल सुरु आहे. माजी सहकारमंत्री (स्व.) विलासराव पाटील-उंडाळकर आणि ज्येष्ठ नेते (स्व) जयवंतराव भोसले यांच्या गटांचा एकोपा आणि संघर्ष जिल्ह्याने पाहिला. त्यांच्या अनेक निवडणुकाही गाजल्या. त्यांच्यानंतरही आमदार डॉ अतुल भोसले आणि ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या गटाचा संघर्ष सुरु होता.
आता कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही गटांनी एकत्र येत सातारा जिल्हा बॅंक, बाजार समितीसह अन्य सहकारी संस्थांसाठी एकोप्याने वाटचाल करण्याचे जाहीर मेळाव्यात ठरविण्यात आले आहे. तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा भोसले-उंडाळकर गट एकत्र आल्याने कऱ्हाड तालुक्यातील राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. भोसले-उंडाळकर युतीचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटासाठी मोठा धसका असणार आहे.
सातारा जिल्ह्यातील कऱ्हाडच्या (Karad) राजकारणात अनेक दशकांपासून प्रभाव टाकणारे भोसले आणि उंडाळकर गट पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या हालचालींमुळे तालुक्याच्या राजकारणाने नवे वळण घेतले आहे. माजी सहकारमंत्री (स्व.) विलासराव पाटील–उंडाळकर आणि ज्येष्ठ नेते (स्व.) जयवंतराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही गटांनी अनेक निवडणुका लढवल्या. सहकार आणि राजकारण या दोन्ही पातळ्यांवर त्यांचा प्रभाव राहिला. काही काळ एकोप्याचे राजकारण झाले, तर काही निवडणुकांमध्ये दोन्ही गट आमने सामने उभे राहिले. या संघर्षामुळे कऱ्हाडच्या राजकारणाला स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती.
गेल्या काही वर्षांत बदललेल्या राजकीय परिस्थितीत सहकारी संस्थांवरील नियंत्रण, स्थानिक संघटनात्मक ताकद आणि आगामी निवडणुकांचे गणित लक्षात घेऊन नवी राजकीय समीकरणे तालुक्यात उदयास येत आहेत. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले आणि ॲड. उदयसिंह पाटील–उंडाळकर यांनी एकत्र येत सहकार क्षेत्रात एकसंघ भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.
दोन्ही गटाच्या एकत्रिकरणामुळे जिल्हा बँक, बाजार समिती आणि भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभेच्याही राजकारणाची दिशा ठरु शकते. गेल्या १२ वर्षांत राजकीय अंतर कायम असताना आता नव्या पिढीतील नेतृत्वाने संघर्षाऐवजी समन्वयाचा मार्ग स्वीकारल्याने तालुक्याची राजकीय समिकरणेच बदलणार आहेत.
राजकीय गणिते बदलणारी घडामोड
भोसले–उंडाळकर गट एकत्र आल्याने कऱ्हाडमध्ये केवळ सहकाराचे नाही, तर विधानसभा मतदार संघातही राजकीय गणिते बदलणार आहेत. कृष्णा कारखान्यापासून सुरू झालेला हा एकोपा जिल्हा बँक, बाजार समिती आणि भविष्यातील निवडणुकांपर्यंत पोहोचणार आहे. दोन्ही गटांची पारंपरिक ताकद आणि कार्यकर्त्यांचे जाळे पाहता हे समीकरण इतर राजकीय गटांसाठी आव्हानात्मक ठरू शकते. मात्र, ही राजकीय मैत्री तात्पुरती रणनीती की दीर्घकालीन सत्तासमीकरणाची सुरुवात, यावर पुढील राजकीय चित्र अवलंबून राहणार आहे.
जिल्हा बॅंकेसाठी फिल्डींग
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची निवडणूक जवळ आली आहे. माजी सहकारमंत्री उंडाळकर यांनी जिल्हा बॅंकेचे अनेक वर्षे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांच्या कार्यकाळात बॅंक नावारुपाला आली. त्यांच्यानंतर ॲड. उदयसिंह उंडाळकरांनी बॅंकेची मागील निवडणूक माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात लढवली. त्यावेळी भोसले गटाने पाटील यांनी सहकार्य केले, त्यामुळे त्यांचा विजय झाला होता.
आता जिल्हा बॅंकेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करुन ॲड. उंडाळकर यांनी कृष्णा कारखान्यासाठी भोसले गटाला साथ दिली आहे. डॉ. सुरेश भोसले यांनीही ॲड. उंडाळकर यांना कोणत्याही परिस्थितीत मदत करणार, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ॲड. उंडाळकरांनी जिल्हा बॅंकेसाठी लावलेली फिल्डींग कितपत यशस्वी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.