Solapur, 13 February : सोलापूर महापालिकेत 87 जागा जिंकत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी पहिल्याच पंधरवड्यात पक्षशिस्तीचा बडगा उगारला आहे. त्यांनी तब्बल 75 नगरसेवकांना नोटीसा दिल्या असून त्याबाबतचा अहवाल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचा इशाराही दिला आहे, त्याचे पडसाद सोलापूर भाजपमध्ये उमटण्याची शक्यता आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी ‘सेवा व समर्पण सप्ताह’ म्हणून साजरी करण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यानुषंगाने सोलापूर (Solapur) महापालिकेतील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित 11 फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमास सर्व नगरसेवकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, सूचना देऊनही भाजपचे (BJP) अनेक नगरसेवक कार्यक्रमास अनुपस्थित राहिले. त्यामुळे पक्षशिस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सूचना देऊनही भाजपचे नगरसेवक उपाध्याय यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे काळे यांनी कठोर कारवाईची भूमिका घेतली आहे. त्यातूनच गैरहजर राहिलेल्या तब्बल 75 नगरसेवकांना काळे यांनी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अनुपस्थित राहिलेल्या नगरसेवकांचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहितीही काळे यांनी दिली.
जबाबदारीने वागणे गरजेचे : नरेंद्र काळे
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे कार्य व विचार हे भाजपसाठी कायमच मार्गदर्शक आहेत. त्यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमास देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष वेळ देऊ शकतात. तसेच, नगरसेवकांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. सूचना देऊनही कार्यक्रमाला गैरहजर राहणे, हे अत्यंत गंभीर मानले जाईल, असा इशारा नरेंद्र काळे यांनी दिला आहे.
सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या भूमिकेचे भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून समर्थन करण्यात येत आहे, त्यामुळे या नोटिशीमुळे पक्षात पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजप आगामी काळात पक्षशिस्तीबाबत अधिक कडक धोरण अवलंबणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.