Laxman Dhoble-Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Laxman Dhoble : ‘भाजपने बहुजनांचा नेता मोठा होऊ दिला नाही, ढोबळेंना पोरासोरांच्या रांगेत बसविले’; कोमल ढोबळेंचे गंभीर आरोप

Assembly Election 2024 : सतत पक्षाच्या कार्यक्रमातून डावलणे, बॅनरवरून फोटो काढणे, किरकोळ व्यक्तींना पाकीटं देऊन आरोप करण्यास सांगणे, अशी प्रवृत्तींकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी डोळेझाक केली, असा आरोप कोमल ढोबळे-साळुंखे यांनी केला.

हुकूम मुलाणी

Mangalvedha, 18 October : माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आपले अख्खे आयुष्य समाजासाठी घालविले, त्यांचे राजकीय अस्तित्व संपविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न मनुवादी प्रवृत्तींकडून झाला. बहुजनांचा नेता त्यांनी मोठा होऊ दिला नाही. याउलट स्थानिक पातळीवर नवख्या पोरासोरांच्या रांगेत ढोबळे यांना बसविण्याचा प्रयत्न झाला. सतत पक्षाच्या कार्यक्रमातून डावलणे, बॅनरवरून फोटो काढणे, किरकोळ व्यक्तींना पाकीटं देऊन आरोप करण्यास सांगणे, अशी प्रवृत्तींकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी डोळेझाक केली, असा आरोप लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या कोमल ढोबळे-साळुंखे यांनी केला.

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी घेतला आहे. त्यानंतर बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा कोमल ढोबळे-साळुंखे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

ढोबळे साळुंखे म्हणाल्या, भारतीय जनता पक्षातही बहुजन समाजातील नेते लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) यांना 10 वर्षे राजकारण, समाजकारणातून बाहेर ठेवले गेले. ज्यांनी समाज कल्याण, उच्च शिक्षण, सामान्य प्रशासन, पणन, पीडब्ल्यूडी, खादी सामोद्योग, अन्न नागरी पुरवठा अशी खाती सांभाळली त्यांना नवख्यांच्या रांगेत बसविण्यात आले आहे.

सोलापूर लोकसभेला बनावट दाखला असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली. त्यानंतर राज्यसभा, विधानसभा, विधान परिषदेवरही डावलण्यात आले. कुठलाही अनुभव नसलेल्यांना, ज्यांचे पक्षासाठी काही योगदान नाही, अशांना संधी देताना जुन्या-जाणत्या अनुभवी नेतृत्वांचा मान-सन्मान राखण्यात भाजपची मंडळी कमी पडली. ज्यांनी आपले आयुष्य समाजासाठी घालविले, त्यांचे राजकीय अस्तित्वच संपविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न मनुवादी वृत्तीकडून झाला, असा हल्लाबोल कोमल ढोबळेंनी केला.

भाजपमध्ये अपमानस्पद वागणूक मिळत असताना ढोबळे यांनी पक्षात थांबून राहणे, माझ्यासह बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मान्य नव्हते. त्यामुळेच बहुजन रयत परिषदेच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन पक्ष सोडण्यासाठी दबाव आणला. त्यानंतर दोन दिवसांनी भाजप सोडला. अडचणीच्या काळात पवारांसोबत जाणे योग्य असल्याची भूमिका मनात ठेवून स्वगृही परत जात असल्याचा मनस्वी आनंद आहे, असेही ॲड कोमल ढोबळे-साळुंखे यांनी सांगितले.

ढोबळे साळुंखे म्हणाल्या, अत्यंत गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन प्राध्यापकाची नोकरी करणारे लक्ष्मण ढोबळे यांना केवळ शरद पवारांमुळे प्रथम विधानसभा, लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. तसेच, राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदार्यंत जाता आले. ढोबळे यांनी शरद पवारांच्या सावलीखाली राज्यभर स्वतःची ओळख निर्माण केली.

राष्ट्रवादीत ‘दादा’गिरी वाढून ज्येष्ठ सहकाऱ्यांना बाजूला सारण्याचे काम केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हुकूमशाहीचा आरोप करत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपला जवळ केले, त्यावेळी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, पवार-ढोबळे या गुरु शिष्यांच्या 1980 ते 2015 या पस्तीस वर्षांच्या राजकारणातील मैत्रीत काही कारणांमुळे दुरावा निर्माण झाला होता. मात्र, ते पुन्हा एकत्र येत असल्याने मनस्वी आनंद असल्याचे ढोबळे साळुंखे यांनी सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT