Kolhapur, 15 March : बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दोन्ही ठिकाणी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे, त्यामुळे या दोन्ही ठिकाणीच्या निवडणुका बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याची उत्सुकता आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी बारामती पोटनिवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे. तसेच सर्वच ठिकाणी निवडणूक बिनविरोध होईल, असे वाटत नाही, असाही दावा केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत (Baramati) विमान अपघातात २८ जानेवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे बारामतीत पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अजितदादांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री निवड करण्यात आली आहे, त्यामुळे सहा महिन्यांत त्यांना विधानसभा अथवा विधान परिषदेचे सदस्य होणे गरजेचे असते, त्यामुळे बारामतीतून सुनेत्रा पवार याच निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच, महायुतीमधील पक्षांकडून कोणीही निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे रिक्त झालेल्या बारामतीची पोटनिवडणूक (Baramati By Election) बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने राहुरी विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. या ठिकाणची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे या ठिकाणाहून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहुरीत नेमकं काय होतंय, याकडे अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार प्रवीण दरेकर यांनी बारामती पोटनिवडणूक कदाचित बिनविरोध होईल, असा दावा केला आहे. आपल्या महाराष्ट्राला एक परंपरा आहे. जेव्हा अशी एखादी दुखद घटना होते, तेव्हा तेथील जनता बिनविरोधचा निर्णय घेत असते.
बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असली तरी सर्वच ठिकाणी निवडणुका बिनविरोध होतील, असं मला वाटत नाही, त्यामुळे काही ठिकाणी निवडणुका होतील, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.